Nashik triple talaq: नाशिकमध्ये बिहारमधील पतीने पत्नीला कुरिअरने तिहेरी तलाक देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशांसाठी छळ आणि आठ तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
कुरिअरद्वारे प्राप्त झालेल्या पत्रातील संशयास्पद मजकुरामुळे पीडितेने नाशिक पोलिसांच्या महिला कक्षात धाव घेत कैफियत मांडली. त्यावरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह मुस्लिम महिलांच्या विवाह अधिकाराचे संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.
Thane Crime: मी जीव देत आहे! आईला फोन, पोलीस पती घरी येईपर्यंत सर्व संपलेलं; विवाहितेसोबत काय घडलं?
कुरिअरद्वारे पत्र पाठवले
पोलिसांच्या माहितीनुसार नाशिकमध्ये माहेरी वास्तव्यास असलेल्या पीडितेला तिच्या पतीने स्वतःच्या हस्तक्षरात एक पत्र लिहून ते कुरिअरद्वारे पाठवत ‘तिहेरी तलाक’ दिल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी संशयित पतीसह सासरे व सासूविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या संशयिताला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. सखोल चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचे गुन्ह्याच्या तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले.
पैशांवरून महिलेचा छळ
जानेवारी २०२२ मध्ये पीडितेचा संशयितासमवेत ‘निकाह’ झाल्यानंतर संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर व्यवसायाकरिता पैसे अपेक्षित असल्याने पतीने सासरच्यांकडून मागणी केली. त्यातून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर संशयिताने पीडितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.
चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका, काय म्हणाले?
आठ तोळे सोने घेतले
पीडितेचे आठ तोळे सोन्याचे दागिनेसुद्धा सासरच्यांनी हडप केले असल्याचा तिने आरोप केला आहे. त्रस्त पीडितेने नाशिकमध्ये येत माहेरी वास्तव्य सुरू केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी संशयिताने कुरिअरने एक पत्र पीडितेला पाठविले. त्यामध्ये ‘तिहेरी तलाक’ देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या सर्व प्रकाराविरोधात गुन्हा नोंदवला गेला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
