• Thu. Jun 18th, 2026

    Thane News: अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं; दोन महिलांवर गुन्हा दाखल

    Thane News: अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं; दोन महिलांवर गुन्हा दाखल

    बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशांची पाकिटे वाटप करताना दोन महिलांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रचार साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, ठाणे: बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन महिला कार्यकर्त्यांना शिंदे-शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी पैशांची पाकिटे वाटप करताना रंगेहात पकडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना बदलापूर पश्चिम भागातील पनवेलकर संकुल परिसरात घडली असून, याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा कबूल आणि सुनिता चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये शिंदे-शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजपसोबत युती असून, या युतीकडून प्रभाकर पाटील निवडणूक लढवत आहेत, तर शिंदे शिवसेनेकडून तुकाराम म्हात्रे मैदानात आहेत. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, २७ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या पैशांची पाकिटे वाटत असल्याची माहिती मिळाली.

    या माहितीच्या आधारे, शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या दोन महिलांना रंगेहात पकडले. यानंतर घटनास्थळी काही काळ शिंदे-शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आणि जोरदार राडा झाला. दोन्ही उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली, ज्यामुळे दिवसभर या प्रभागात तणावपूर्ण राजकीय वातावरण होते. प्रचाराच्या धुराळ्यात पैसे वाटपावरून झालेल्या राड्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले.

    दरम्यान, राडा सुरू असतानाच शिंदे-शिवसेना कार्यकर्त्यांनी या महिलांना पकडून जाब विचारला आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तातडीने माहिती दिली. या पाकिटांमध्ये प्रत्येकी तीन-तीन हजार रुपये भरलेले होते. निवडणूक अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलांकडून काही प्रचार साहित्य आणि १ लाख ९२ हजार ५०० रुपये जप्त केले.

    अजित पवार गटातील या दोन्ही महिलांवर निवडणूक विभागात कार्यरत असलेले जयवंत डोंगरे (५७) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय साहिंता कलम १७३, १४७, २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा