• Wed. Jun 17th, 2026
    दहा वर्षांपूर्वी ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा, 89 लाखांची लूट; न्यायालयाने एकाचवेळी दहा आरोपींना ठोठावली शिक्षा, काय होता संपूर्ण खटला?

    अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने सुरभी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील दहा आरोपींना चार ते पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या या दरोड्यात ८९ लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

    अमुलकुमार जैन, रायगड: अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे दहा वर्षांपूर्वी झालेल्या सुरभी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील दहा आरोपींना अलिबाग जिल्हा व सत्र न्यायालयाने चार ते पाच वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-२ सुनीता सुशीला रमेशचंद्र तिवारी यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला असून दशकभर चाललेल्या चर्चित खटल्याला पूर्णविराम मिळाला आहे.

    २६ ऑगस्ट २०१५ रोजी मनोज कांतिलाल जैन यांच्या मालकीच्या सुरभी ज्वेलर्स दुकानात शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी दरोडा टाकला होता. या टोळीत मुंबईतील कुप्रसिद्ध याकुब चिकना गँगशी संबंधित जिनाह उर्फ जे. के. नैनामोहम्मद (रा. तुतुकुडी, तामिळनाडू), इमदाद इस्माईल मुजावर (रा. श्रीगाव, अलिबाग), मोहम्मद अकबर कासीम, करण रामआशिष विश्वकर्मा (रा. मुंबई), मुबीन सगीर शेख (रा. कुर्ला, मुंबई), बिलाल कासिम कुरेशी (रा. कुर्ला, मुंबई), प्रदीप उर्फ बबलू पाटील (रा. श्रीगाव, अलिबाग), समीप भगवान पाटील (रा. पोयनाड, अलिबाग) आणि सनी सुनिल पाटील (रा. पोयनाड, अलिबाग) यांचा समावेश होता.

    या आरोपींनी फिर्यादी मनोज जैन यांचे भाऊ भारत कांतिलाल जैन यांना मारहाण करून दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, दागिन्यांचे ट्रे आणि रोख रक्कम असा एकूण ८९ लाख ३१ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. चोरीतील काही दागिने व्यापारी बिपीन सोहनलाल बाफना (मुळ रा. पाली, राजस्थान — सध्या राह. मुंबई) याला विकण्यात आले होते.

    घटनेनंतर पोयनाड पोलिस ठाण्यात भादंवि ३९५, ३९७, ४१२, आर्म्स अ‍ॅक्ट व मोंका अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात २ लाख २१ हजार ८५० रुपये किमतीचे ८५.५७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले, तर दुसऱ्या टप्प्यात १६ लाख १८ हजार ६७५ रुपये किमतीचे ६४० ग्रॅम सोन्याचे दागिने, एक सिल्व्हर रंगाची सॅंट्रो कार, गावठी रिव्हॉल्वर, तीन जिवंत काडतुसे आणि चोरीची महिंद्रा झायलो जप्त केली.

    न्यायालयाने दाखल पुरावे आणि साक्षींच्या आधारे जिनाह उर्फ जे. के. नैनामोहम्मद व करण रामआशिष विश्वकर्मा यांना ४ वर्षे, तर इमदाद मुजावर, मोहम्मद अकबर कासीम, मुबीन शेख आणि बिलाल कुरेशी यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच प्रदीप पाटील, समीप पाटील, सनी पाटील आणि व्यापारी बिपीन बाफना यांना ४ वर्षांची शिक्षा ठोठावली असून सर्व आरोपींना प्रत्येकी ५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला.

    तपासात तत्कालीन पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलिस अधीक्षक राजा पवार, पेण विभागीय उपअधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, एलसीबीचे निरीक्षक जितेंद्र व्हानकोटी आणि स्थानिक अधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

    पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या सूचनेनुसार पेण विभागीय पोलिस उपअधीक्षक जालिंदर नारकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलिस ठाण्याचे एपीआय विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या पथकाने गुन्हा सिद्ध होण्यासाठी अधिक सबळ पुरावे अलिबाग न्यायालयात सादर केले. तसेच आरोपींना शिक्षा होण्यासाठी सरकारी अभियोक्ता संतोष पवार यांनी पोलिस विभागाच्या वतीने प्रभावीपणे कामकाज पाहिले. दहा वर्षांपूर्वीच्या या गाजलेल्या दरोडा प्रकरणाला शेवटी न्याय मिळाल्याने व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed