एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची शह-काटशहाची खेळी सुरू आहे. शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची अमित शहांकडे तक्रार केली. एकाच कुटुंबातील अनेकांना तिकिटं देण्याच्या शिंदेसेनेच्या धोरणावर टीका होत असून, आता एका कुटुंबाला केवळ दोघांनाच उमेदवारी मिळणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या मानल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी उलटं चित्र दिसू लागलं आहे. बदलापूरमधील शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील सहा सदस्यांना उमेदवारी मिळाल्यानं शिंदेसेनेवर टिकेची झोड उठली. घराणेशाहीचे आरोप होऊ लागले. आता कल्याण-डोंबिवलीसह त्याची अन्य ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी भाजप आणि शिंदेसेना घेणार आहे. त्यामुळे आता एकाच घरातील केवळ दोघांना उमेदवारी मिळू शकेल. ‘लोकमत’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. भाजप, शिंदेसेनेच्या या निर्णयानं राजकीय घराण्यांची गोची होणार आहे.
‘बाहेर खाट टाकून झोपा…’; महिलांबद्दल आधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलं स्पष्टीकरण, गुलाबराव पाटील म्हणाले…
वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील सहा जणांना शिंदेसेनेनं उमेदवारी दिली. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर स्वत:सह पत्नी, मुलांचे फोटो टाकून स्वत:सह आपल्या कुटुंबातील सदस्यांचं प्रमोशन सुरु केलं होतं. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत चार किंवा तीन उमेदवार निवडून येतात. त्यामुळे एकाच कुटुंबात चारही तिकिटं मिळवण्याकडे स्थानिक नेत्यांचा कल दिसून येतो. स्थानिक पातळीवरील वर्चस्वाचा फायदा घेऊन कुटुंबातील अनेकांना राजकारणात स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यामुळे प्रभागातील नागरी कामं, त्यासाठीची कंत्राटं, त्यातील टक्केवारी या सगळ्यावर वर्चस्व राखता येतं.
‘वाल्मीक कराडला फाशी होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा निर्धार
एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकिटं, मंत्री, आमदारांच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना उमेदवाऱ्या यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. कुटुंबाला राजकारणात ‘सेटल’ करु पाहणाऱ्या, त्यांनाच तिकिटं देणाऱ्या नेत्यांची लांबलचक यादी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका नेत्यांच्या मानल्या जातात. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. पण आता तिथेही नेत्यांच्या कुटुंबियांनी घाऊक प्रमाणात शिरकाव केल्यानं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आम्ही काय केवळ सतरंज्याच उचलायच्या का, असे प्रश्न कर्यकर्ते विचारु लागले आहेत.
