Mumbai Metro: ठाणे ते मुंबई मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला 500 कोटींचे व्याजमुक्त कर्ज दिले आहे. या निधीमुळे दहिसर, मीरा रोड, ठाणे, कल्याण मार्गावरील 9 मेट्रो प्रकल्पांना गती मिळणार असून, वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळेल.
एमएमआरडीएला मिळालेल्या या कर्जातून विविध प्रकल्पांसाठी निधी वर्ग करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाईन 5, जी ठाणे–मुंबई–भिवंडी या मार्गावर धावणार आहे, तिच्यासाठी 52 कोटी 38 लाख 60 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मार्गिकेमुळे ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांना मोठी सोय होणार असून वाहतूक कोंडीपासूनही सुटका मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय या मार्गाने ठाणेकरांना मुंबईतील इतर मेट्रो मार्गांशी उत्तम जोडणी मिळणार आहे.
Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दीड तासाचा प्रवास १० मिनिटात, केंद्राकडून मंजुरी मिळालेले मार्ग नेमके कोणते?
कोणत्या मार्गांसाठी कर्ज मंजूर?
इतर प्रकल्पांसाठीही महत्त्वाचा निधी अदा करण्यात आला आहे. मुंबई मेट्रो लाईन 6 (स्वामी समर्थ नगर–जोगेश्वरी–विखरोळी) साठी 32 कोटी 95 लाख 20 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. मुंबई मेट्रो लाईन 2A, जी दहिसर पूर्व ते डीएन नगर जोडते, तिच्यासाठी 28 कोटी 89 लाख 70 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मुंबई मेट्रो लाईन 2B (DN नगर–मांडले) प्रकल्पासाठी 112 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मुंबई मेट्रो लाईन 4 आणि 4A, म्हणजे वडाळा–घाटकोपर–मुलुंड–कासारवडवली आणि कासारवडवली–गायमुख मार्गांसाठी 98 कोटी 72 लाख 80 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई मेट्रो लाईन 7 (अंधेरी पूर्व–दहिसर पूर्व) साठी 49 कोटी 63 लाख 20 हजार रुपये मंजूर झाले आहेत. मुंबई मेट्रो लाईन 9 (दहिसर–मीरा रोड) आणि मार्ग 7A (अंधेरी–छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ) प्रकल्पांसाठी एकत्रित 66 कोटी 71 लाख 40 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्याशिवाय गायमुख–शिवाजी चौक, मीरा रोड प्रकल्पासाठी 86 कोटी 14 लाख 80 हजार रुपये मंजूर झाले आहेत, तर मुंबई मेट्रो लाईन 12 (कल्याण–तळोजा) साठी 1 कोटी 8 लाख 90 हजार रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
शिवसेना व रिपब्लिकन सेनेची युती, एकनाथ शिंदेंना मिळाली आनंदराज आंबेडकरांची साथ
या सर्व निधी वितरणाबाबतचा जीआर राज्य सरकारने बुधवारी जारी केला असून, यामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील सर्व मेट्रो प्रकल्पांना वेग येण्याची अपेक्षा आहे.
