काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने ऑपरेशन लोटस राबवत दोन दिवसांत दोन बड्या नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेते हे एकेकाळी अमित देशमुख यांच्या जवळचे नेते आहेत. त्यातील एक माजी महापौर तर दुसरे माजी आमदार आहेत.
काही काळापूर्वी विक्रांत गोजमगुंडे आणि त्र्यंबक भिसे हे अमित देशमुख आणि दिलीपराव देशमुख यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. लातूर ग्रामीणचे माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी आज औपचारिकरित्या भाजपात प्रवेश केला. उदगीर नगरपालिकेच्या प्रचारसभेला आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपची सदस्यता स्वीकारली.
कोण आहेत त्र्यंबक भिसे?
त्र्यंबक भिसे हे 2014-2019 या काळात लातूर ग्रामीणचे आमदार होते. त्याआधी 2009 ते 2014 दरम्यान ते जिल्हा परिषद सदस्य होते. काँग्रेस नेते दिलीपराव देशमुख यांचे ते कट्टर समर्थक मानले जात. मात्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याशी त्यांचे समीकरण कधीच जुळले नाही. 2019 नंतर काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका कमी होत गेली, बदललेली राजकीय समीकरणे, लातूर ग्रामीणमधील धीरज देशमुख यांचा पराभव आणि दिलीपराव देशमुख यांचा घटता प्रभाव या कारणांमुळे त्यांनी अखेर काँग्रेसला रामराम केला आहे.
‘मी कुणाच्या टक्केवारीवर जगणारा नाही’, आधी निलेश राणेंची धाड, आता भाजपचे विजय केनवडेकर यांचं प्रत्युत्तर
लातूरच्या राजकारणावर काय परिणाम होणार?
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला लातूर जिल्ह्यात गळती लागलेली पाहायला मिळत आहे. एकेकाळी लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र आता याच काँग्रेसला गळती लागली आहे. काही दिवसांपूर्वी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज माजी आमदार त्र्यंबक भिसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे लातूरच्या राजकारणामध्ये अनेक गणितांमध्ये बदल होणार आहेत. भिसे यांचे काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्याशी जुळत नसल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. त्याला आज पूर्णविराम मिळाला आहे.
शरद पवारांनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, म्हणाले, ‘माझ्यासारखे लोक…’
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून त्र्यंबक भिसे यांनी काँग्रेसकडे उमेदवारीचे मागणी केली होती. मात्र पक्षाने धीरज देशमुख यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये याचा परिणाम लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी भिसे यांनी लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांची भेट घेतलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आज त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.
