नागपूरच्या कन्हान नगर परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी केली आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कन्हान नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराने अचानक अर्ज मागे घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रकारामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आशिष जायसवाल यांनी “मोठी जादू” करूनच काँग्रेसच्या उमेदवाराला आपल्या गळाला लावल्याचा आरोप बर्वे यांनी केला. या घडामोडींमुळे कन्हान नगराध्यक्ष पदासाठी आता काँग्रेसकडे अधिकृत उमेदवारच उरलेला नाही.
काँग्रेसला मोठा धक्का
राजेश यादव हे कन्हान परिसरात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते निवडून आले होते. नगर परिषद उपाध्यक्ष, नगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशी त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्या अचानक निर्णयामुळे कन्हानमधील काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. ही घटना विशेष लक्षवेधी ठरते कारण खासदार श्यामकुमार बर्वे यांचे हेच मूळ गाव आहे.
मालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक, अस्लम शेख यांच्या विरोधात रोष
या परिस्थितीला काँग्रेसने तत्काळ उत्तर दिले. राजेश यादव यांची उमेदवारी परत घेतल्यानंतर त्यांच्या पुतण्या माजी नगरसेवक विनय यादव यांची कन्हान काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. ५ मध्ये विनय यादव यांना अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला असून काँग्रेसने आता नव्या दमाने निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.
श्यामकुमार बर्वे काय म्हणाले?
यावर खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली. “राज्यमंत्री आम्हाला नैतिकतेचे धडे देतात. पण लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात विद्यमान आमदार उभा केला होता हे ते विसरले आहेत. आज पारशिवनीत काँग्रेसचा उमेदवार घेऊन शिवसेनेचा उमेदवार बनवला जात आहे. सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून त्याचा गैरवापर करु नका. प्रत्येक नगरसेवकाला फोन करून धमकावणे, अर्ज मागे घेण्यासाठी लालच दाखवणे सुरू आहे. आम्ही हे सहन करणार नाही. दोन तारखेला मतदारच योग्य उत्तर देऊन दाखवतील”, असेही खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले.
