एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत जावून अमित शाह यांच्याकडे राज्यातील घडामोडींवरुन नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी जवळपास तासभर चर्चा केल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जावून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अमित शाह यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती टीव्ही 9 ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात ऑपरेशन लोटस राबवलं जात असल्याची खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांनी ज्यांचा पराभव केला त्यांना पक्षप्रवेश देत भाजपने त्यांची ताकद वाढवली, अशी देखील तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीत लढवल्या जातील, असं आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं. पण सध्या राज्यात अनेक ठिकाणी भाजपने वेगळी चूल मांडल्याचं बघायला मिळालं आहे. त्यावरुनही एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. दरम्यान, यानंतर आता अमित शाह यांच्याकडून काय तोडगा काढला जातो? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
एकनाथ शिंदे हे सातत्याने दिल्लीत जावून अमित शाह यांची भेट घेत असतात. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी सलग तीनवेळा दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे.
एकनाथ शिंदेआणि अमित शाह यांच्या भेटीचं आणखी एक कारण आहे. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट होऊ शकतो. त्यावेळी शिवसेनेला काही अधिकचे पदं दिली जातात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मंत्रिमंडळात शीतयुद्ध सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाकाला गती मिळाली आहे. त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची नाराजी होती. या फोडाफोडीच्या राजकारणबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबईतही मोठ्या घडामोडी
एकनाथ शिंदे एकीकडे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले असताना इकडे मुंबईतही मोठ्या घडामोडी घडलेल्या बघायला मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. यावेळी तीनही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी कशी दूर करावी? याबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यामुळे याबाबतही बैठकीत चर्चा झाली असावी, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात आहे.

