Maharashtra Government: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठीची अंतिम मुदत उद्या संपत आहे. परंतु अजूनही अनेक महिलांची केवायसी बाकी आहे. अशातच सरकार ई-केवायसीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
लाडकी बहीण योजनेत कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत, तसेच आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे. पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला जाणार आहे. या योजनेत सुरुवातीला 2 कोटी 9 लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी निकषांमध्ये न बसणाऱ्या सुमारे 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा परिस्थितीत, सरकार महिलांची नाराजी ओढवून घेऊ इच्छित नाही. त्यामुळे, निवडणुका होईपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे महिलांना दिलासा मिळण्याची आशा आहे.
कशी करावी ई-केवायसी प्रक्रिया?
मोबाईलवरून ई-केवायसी (eKYC) करणे आता सोपं झालं आहे. लाडकी बहीण योजनेसारख्या सरकारी सेवांसाठी तुम्ही घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. लाडकी बहीण योजनेच्या ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवर जावे लागेल. तिथे ‘ई-केवायसी’ हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) टाकून पडताळणी करा.

