छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बँकेचे 25 लोखी चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाण्यात गणेश आनंदा पहिलवान (वय ५९, रा. ५९, रा. नवीन कावसान अन्नपुर्णा नगर, जवळ, पैठण ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश पहिलवान हे सेवानिवृत्त झालेले आहेत. ते बँकेत रोख रक्कम एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नेण्याचे काम करतात. १५ नोव्हेंबर रोजी गणेश पहिलवान यांनी नारळा पैठण येथील शाखेतून रोख रक्कम गोणीत टाकून स्कुटीवरून पैठण ते पाचोड रोडने दावरवाडी शाखेत जात होते. दावरवाडी शिवारात पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी पहिलवान यांना धाक दाखवून २५ लाख रूपयांची रोख रक्कम पळवून नेली. या घटनेत पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेनेही सुरू केला. या प्रकरणात बँकेमध्ये काम करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली. तसेच दिवसभरात बँकेत आलेल्या लोकांची माहिती काढण्यात आली. या माहितीत संशयीत व्यक्तीची ओळख समोर आली. पोलिसांनी सीसीटीव्हीसह तांत्रिक माहितीच्या आधारे भारत राजेंद्र रूपेकर याच्यासह त्याचे तीन साथीदार यांना ताब्यात घेतले. या चौघांच्या ताब्यातून २५ लाखांच्या रोख रक्कमेसह सहा लाखांची कार आणि आठ मोबाईल असा एकूण ३१ लाख ५६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. १६ तासांत २५ लाख रूपयांची लुटमारी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेणाऱ्या गुन्हे शाखेच्या पथकाला पोलीस अधिक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांनी कौतूक केले.
लुटमारीचा मास्टरमाईंड दोन वर्षानंतर आला बँकेत
या लुटमारीच्या प्रकरणात गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यानंतर, एका संशयीत व्यक्तीचे खाते हे पैठण शाखेत असताना, दोन वर्षात संशयीत व्यक्ती हा कधीही आला नाही. घटनेच्या दिवशीच तो बँकेत आला होता. ही बाब गुन्हे शाखेला कळताच, त्यांनी भारत राजेंद्र रूपेकर याचा शोध घेतला. रूपेकर याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने लुटमारीचा कट रचल्याची कबुली दिली. या प्रकरणात लुटमारीच्या रक्कमेतील दहा लाख रूपये रूपेकर याने ठेवले. तर पाच लाख रूपये तिघांमध्ये वाटप केले होते, अशीही माहिती समोर आली आहे.
डमी उमेदवाराचा गुन्हा
२५ लाख लुटमारीच्या प्रकरणात लुटमारीचा मास्टर माईंड भारत राजेंद्र रूपेकर याच्यावर वर्ष २०१७ मध्ये पोलीस भरती प्रकरणात डमी उमेदवार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशीही माहिती पोलीस अधिक्षक डॉ. राठोड यांनी दिली. सदर गुन्हाही भारत रूपेकर याने आर्थिक विवेंचनातून केल्याची कबुली दिली.

