• Tue. Jun 16th, 2026

    Solapur News: लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, सोलापूर हळहळलं

    Solapur News: लेकीसोबत अखेरची भेटही होऊ शकली नाही; मुलीच्या घरी जाताना वाटेत मृत्यू आडवा आला, सोलापूर हळहळलं

    Solapur Fathers Death: सोलापुरात एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती आपल्या लेकीला भेटायला तिच्या घरी जात असताना हा अपघात झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अरुण बाबर, पंढरपूर: लेकीला भेटून येतो, असं सांगून घरातून निघाले ते कधीही न परतण्यासाठीच. घरातून निघाले पण लेकीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच बापाचा मृत्यू झाला. तिकडे लेक बाबा येतील म्हणून दाराकडे डोळे लावून बसली होती. पण, आली ते वडिलांच्या मृत्यूची बातमी. वाटेत एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, बाबांची अखेरची भेटही होऊ न शकल्याने लेकीने सुन्न करणारा आक्रोश केला. तर या घटनेने कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. तर, ज्या वाहन चालकाने या व्यक्तीच्या दुचाकीला धडक दिली, तो सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे.

    नेमकं काय घडलं?

    मंगळवेढा ब्रह्मपुरी या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (15 नोव्हेंबर) सायंकाळी एक भीषण अपघात घडला. या घडलेल्या भीषण अपघातात 60 वर्षीय बब्रुवहान यशवंत सोनवणे (राहणार ब्रह्मपुरी) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लेकीला भेटण्यासाठी घरातून निघालेल्या बब्रुवहान सोनवणे यांचा लेकीच्या घरी जाण्याचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे. पाठीमागून आलेल्या कारणे दिलेल्या भरधाव धडकेत त्यांच्या मोटरसायकलचा चेंदामेंदा झाला आणि त्यातच त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
    Maharashtra TimesSolapur News: मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरुन… इन्स्टावर पोस्ट केली अन् मग तरुणाने जीव दिला, आई-वडिलांचा टाहो

    मागून आलेल्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू

    याबाबतची फिर्याद किशोर सोनवणे यांनी दिली असून दिवंगत बब्रुवहान सोनवणे हे एम एच 13 डी के 3211 या दुचाकीवरून मंगळवेढ्याकडे जात होते. यावेळी इंडियन पेट्रोल पंपाजवळील पाटील वस्ती परिसरात ते पोहोचताच के ए 48 एम 4205 या कारच्या चालकाने भरधाव वेगात येत मागून त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर तो कारचालक थांबून मदत करणे तर दूरच तो घटनास्थळावरून थेट पसार झाला.ही धडक इतकी जबरदस्त होती की सोनवणे यांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. अपघातानंतर गाडीचा चेंदामेंदा झाला, तर सोनवणे यांना रस्त्यावर पडलेलं पाहून आसपासचे लोक धावत आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा