Solapur Lawyer Sagar Mandrupkar Suicide : सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. सागर मंद्रूपकर यांनी काल बुधवारी दुपारी आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने स्लॅबवरील लोखंडी हुकाला गळफास घेतला. काही वेळानंतर ही घटना घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना खाली उतरवून तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र, तेव्हाच डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Sangli Crime : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी काल फील्डिंग, पिस्तुल काढताना पोलिसांनी धरलं; आज जेलमध्ये नको ते घडलं..
घटनास्थळी सुसाईड नोट
घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्या चिठ्ठीत सागर यांनी लिहिलं आहे की, ‘आईकडून होणाऱ्या सततच्या दुजाभावामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कठोर शिक्षा करा.’ या मजकुरावरून कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सोलापुरात खळबळ
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अॅड. सागर मंद्रूपकर यांचा पोलिसांबरोबरही काही वाद झाला होता. हे प्रकरण सोलापूर बार असोसिएशनपर्यंत पोहोचलं होतं. त्या वादामुळे सागर मानसिक ताणाखाली होते का, याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. पोलिसांनी या सर्व बाबींचा तपास सुरू केला असून आत्महत्येचं नेमकं कारण समोर येणं बाकी आहे. तरुण वकिलाने आत्महत्या केल्याने सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Buldhana News: मुंबईहून घराकडे निघाले, मात्र तो प्रवास ठरला अखेरचा, काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू
मृत्यूचं कारण गुलदस्त्यातच
पोलिसांनी ताबडतोब तरुण वकिलाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही. अॅड. सागर मंद्रूपकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळताच बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे व पदाधिकारी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते. 18 सप्टेंबर रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात पोलिसांकडून मयत अॅड. सागर मंद्रूपकर यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांना वकील संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

