Ajit Pawar On Sharad Pawar: बारामती नगरपरिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांबद्दल आपुलकी व्यक्त केली.
ती चिट्टी पाहताच अजित पवारांनी आपल्या भाषणाचा सगळा टोनच बदलला. अजित पवारांनी अचानकच शरद पवारांविषयी अनेक प्रेमाचे शब्द काढले, त्यांना काकांबद्दल प्रेमाचा पान्हा फुटल्यासारखे यावेळी पाहायला मिळाले.
आता लोकसभेला असं झालं, तसं झालं, हे सांगत बसू नका. एका बाजूला पवार साहेब, एका बाजूला मी होतो. परंतु मी जी काही वेगळी राजकीय भूमिका घेतली. ते झाले गेले गंगेला मिळाले. पण आता जरा दिलदारपणा वाढवा. मला निवडून द्यायला पवार साहेबच कारणीभूत आहेत ना? मी काय वरून पडलो का? हे कसे विसरता येईल, असे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
बारामतीत एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला साहेब होते. साहेबांना लोक कसे सोडतील? साहेबांवरही बारामतीचे प्रेम आहेच ना. मला खासदारकीला ४८ हजार मते कमी पडली. मी मान्य केले की नाही? पण मग विधानसभेच्या वेळेस हे सगळे प्रेम पुन्हा सुरू झाले की नाही. भरघोस मतांची मला बारामती तालुक्यात पिछाडी होती. मग विधानसभेला १ लाख मते कुठून आली? झालं गेलं गंगेला मिळालं. काही गोष्टी सोडायच्या असतात. कऱ्हा नदीला मिळालं, सोनगाव वरून चंद्रभागेला मिळालं, असं अजित पवार म्हणाले अन् भर सभेत एकच हशा पिकला.
पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसं काहीजण निवडणुकीत उगवतात. निवडणूक झाल्यावरती बाहेर दिसतात का? कधी तुमच्या सुख दुखात आलेत का? याचा विचार करा. माझ्यावर टाकलेला विश्वास कधीही खोटा ठरवू शकणार नाही, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

