राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात होती.
विखे पाटील यांचं स्पष्टीकरण काय?
“मी परवा एका कार्यक्रमात गेलो होतो. तिथे मी काय भाषण केलं ते दाखवलंच नाही. दुसरंच दाखवलं. कर्ज काढा आणि माफीची मागणी करा, असं वक्तव्य केल्याचं दाखवलं. मी भाषणात काय म्हणालो होतो? आपण निवडणुका लढतोय. निवडणुका येताच सोसायटी काढतो. सोसायटी थकली की पुन्हा कर्जमाफीची मागणी करतो. भाषणाचा पुढचा जो मुद्दा आहे तो दाखवलाच नाही. आता बोलायची पंचायत झाली. यापुढे मी भाषणच करणार नाही, असं ठरवलं आहे. आपला डीएनए शेतकऱ्याचा आहे”, अशा शब्दांत राधाकृष्ण विखे पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्यावर आपली बाजू मांडली.
अजित पवारांनंतर राधाकृष्ण विखेंचं वादग्रस्त विधान; कर्जमाफीवरून उद्धव ठाकरेंना टोला
नेमकं काय म्हणाले होते?
“सोसायटी काढायची, कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जबाजारी व्हायचं. त्यानंतर पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. हे आपलं अनेक वर्ष काम चालू आहे. त्याची काही चिंता नाही. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरच केलं आहे, शंभर टक्के आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत हे आम्ही जाहीरच केलेलं आहे”, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.
‘विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख बक्षीस देणार’, बच्चू कडूंची घोषणा
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांची गाडी फोडणाऱ्याला आपण एक लाख रुपये बक्षीस देणार, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. “नाव राधाकृष्ण आणि कृत्य कंसासारखं करायचं. तर त्यांना पक्षातून हाकलून काढलं पाहिजे. एकीकडे देवेंद्र फडणवीस कर्जमाफीची तारीख देतात आणि हे वाचाळवीर मंत्री महोदय सांगतात की, कर्जमाफी कितीदा द्यायची. अरे लोकं तुम्हाला मारत नाही त्याबद्दल धन्यवाद माना. मी तर म्हणतो, जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाखांचं बक्षीस देईन. मी तर फोडणारच आहे. पण ही नालायकी थांबवा. हे सहन करणार नाही”, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं.

