उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आज एका मोठ्या राजकीय सस्पेन्सवर पडदा टाकला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. जय पवार यांच्या निवडणूक लढण्याबाबात त्यांनी आज माहिती दिली. “जयबाबत मी तसं काही ऐकलं नाही आणि तसं काही होणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. पार्थ पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले त्याबाबात अजित पवार यांनी सांगितले की,”पार्थ पवार समोर येत नाहीत. मी भूमिका मांडली, त्याच्या बापाने मांडली. मी मीडियासमोर बोललो. माहिती घेतल्याशिवाय बोलत नाही. मी दुसऱ्या दिवशी भूमिका मांडली.”
“मधल्या काळात काही घटना घडल्या, मी माझी भूमिका स्पष्ट मांडली. चौकशी सुरू झाली आहे. वस्तुस्थिती जनतेसमोर येईल. 1 रुपयाचा व्यवहार न करता कसा कागद होऊ शकतो, हे आजपर्यंत माझ्या लक्षात आले नाही. ज्याने ही नोंदणी केली, त्याने कशामुळे केले हे एका महिन्यात कळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले अधिकारी चौकशी समितीत नेमले आहेत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“मागे माझ्यावर ७० हजार कोटींचा आरोप झाला, त्याला १५-१६ वर्षे गेली. निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात. पारदर्शकपणे काम करायचे, पण ते झाले की लगेच बारामतीतील कुठल्या जमिनीचे कागद काढायला लागतात. माझ्या नावाचा वापर करून जवळचे कार्यकर्ते किंवा नातेवाईकांनी काही सांगितले तरी ते नियमात असेल तरच अधिकाऱ्यांनी करावे. मी सर्व वर्ष अधिकाऱ्यांना हे आवाहन करतो”, असं अजित पवार म्हणाले.
शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही सुसंस्कृत म्हणून राज्यात राजकारण करतो.” अशा शब्दांत अजित पवारांनी आरोपांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली आणि चौकशीतून सत्य बाहेर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
‘राजकीय कारकिर्दीत चुकीचे काही नाही केले’
“नियमाला धरून, घटनेच्या चौकटीत राहून कामे केली आहे. बारामतीतील कुठल्या कोणत्या जमिनीचे काहीही काढायला लागले. माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्यापासून मी कुठलीही चुकीची गोष्ट होऊ देत नाही”, असे अजित पवार यांनी सांगितले.
‘शहराचा कायापालट ही जबाबदारी माझी’
“सोमवार ते शुक्रवार आम्ही राज्याचा आढावा घेतला. बारामतीत चाचपणी केली. पूर्वी बारामती आघाडीवर लढली जायची ही परंपरा होती. पण मी सक्रिय झाल्यावर ठरवलले की पक्षाच्या नावावर लढायचे. पक्षविरोधी कृती झाल्यास कारवाई करता येते. महाराष्ट्रात नऊ वर्षांनी २८८ नगरपरिषद आणि पंचायत निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर मी बारामतीसह राज्यभर लक्ष ठेवून आहे. पुढच्या पाच वरषांत शहराचा कायापालट करायचा आहे. बारामतीकरांनी मला नेहमी साथ दिली आहे. आता बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीचा कायापालट करून दाखवणार असून, काम करून घेण्याची जबाबदारी माझी असेल”, असेही अजित पवार म्हणाले.

