Parth Pawar Land Scam : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असल्याने सरकारने सत्य समाजासमोर मांडावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी म्हटलं की, “पुण्यातील जमीन व्यवहाराचे प्रकरण गंभीर असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एखादी गोष्ट गंभीर असल्याचं मुख्यमंत्री सांगत असतील तर त्याबाबत चौकशी करून वास्तव चित्र त्यांनी समाजासमोर ठेवलं पाहिजे. त्यामुळे ते काम त्यांनी करावं, अशी आमची अपेक्षा आहे,” असं पवार म्हणाले. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, कुटुंबातील एका सदस्यावर जमीन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याबद्दल पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र “प्रशासन, राजकारण, कुटुंब आणि कुटुंबप्रमुख या गोष्टींमध्ये फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून म्हणाल तर आम्ही एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवल्या आहेत. माझा एक नातू हा अजित पवारांविरोधात उभा होता. अजित पवारांची पत्नी माझ्या मुलीविरोधात निवडणुकीत उभी होती,” असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांची पाठराखण केल्याचं दिसून आलं होतं. “हे प्रकरण ऐकल्यानंतर मी सकाळीच पार्थ पवार यांना फोन केला आणि नेमका विषय काय आहे, हे विचारलं. त्यावर, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. माझ्या वकिलांशी बोलणं झालं आहे,’ असं पार्थ म्हणाले. जर त्यांचे वकिलांशी बोलणे झाले असेल, तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतीलच,’ असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं.
दरम्यान, “पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमकं काय आहे, हे सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. जमीन सरकारी होती तर मग ती विकता येते का, जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का आणि तहसीलदार म्हणतात की कागदपत्रांवर मी सही केली नाही, मग सहीशिवाय व्यवहार झाला कसा?” असे प्रश्न सुळे यांनी उपस्थित केले होते.

