Parth Pawar Pune Land Stamp Duty Scam Case : पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन खरेदी प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या कंपनीवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचं वृत्त टीव्ही 9 ने दिलं आहे. मुद्रांक शुल्क विभागाचे सहनोंदणी महानिरीक्षर रवींद्र मुठे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणात सब रजिस्टरवरही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती आहे.
“मे 2025 खरेदी खद नोंदवण्यात आला आहे. यामध्ये जुना सातबारा म्हणजेच बंद झालेला सात बारा देवून खरेद खद नोंदवण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल संबंधित खरेदी-विक्री करणारे आणि तत्कालीन सब रजिस्टार यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय झालेला आहे. संबंधित सब रजिस्टर यांना निलंबित करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ज्यांनी खोटे कागदपत्रे देवून शासनाची फसवणूक केली आहे, तसेच ज्यांनी खोटे कागदपत्रे घेऊन संगनमत केलेलं आहे त्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे”, अशी प्रतिक्रिया सहनोंदणी महानिरीक्षर रवींद्र मुठे यांनी टीव्ही9ला दिली आहे.
मुद्रांक शुल्क विभागाची याआधीच नोटीस
पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीला आणि मुद्रांक शुल्क विभागाने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्कची दोन टक्के रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. अमेडिया कंपनीला दोन टक्के प्रमाणे सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरावे यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने मुद्रांक शुल्कमध्ये सवलत घेत फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरले होते. मात्र मुद्रांक शुल्क माफी असली तरी ती फक्त पाच टक्के एवढ्या रकमेसाठी आहे. पुणे शहरांमध्ये एक टक्का एलबीटी आणि एक टक्का मेट्रो सेस म्हणून मुद्रांक शुल्क आकारले जाते. मेट्रोसिस आणि एलबीटी अशी मिळून दोन टक्के मुद्रांक शुल्क याला माफी नाही किंवा सवलत नाही. त्यामुळे ही दोन टक्क्याने होणारी सहा कोटींची रक्कम भरण्यासाठी नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे.
‘अजित पवारांनी राजीनामा द्यावा’, ठाकरे गटाचं आंदोलन
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुण्यात आक्रमक झाले. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यात आंदोलन केलं. या आंदोलनात अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणबाजी करण्यात आली. या आंदोलनावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

