Pune Andekar Komkar Gang War Murder : आंदेकर टोळीच्या आयुष कोमकरची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी अनेक जणांना अटक केली होती. त्यानंतर आता कोमकर गटाशी संबंधित गुंडाच्या भावाची हत्या करण्यात आली आहे.
आंदेकर-कोमकर गँगवॉर पुन्हा भडकला
आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र, तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून आलं आहे. वनराज आंदेकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळेचा हा गणेश काळे भाऊ आहे. त्यामुळे त्याच्या हत्येमागे गँगवॉर आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्यावर्षी वनराज आंदेकरची हत्या कोमकर गँगकडून करण्यात आली होती. त्यानंतर त्या हत्येचा बदला म्हणून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आंदेकर गँगचा प्रमुख बंडू आंदेकर आणि त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील ही हत्या होत असेल तर आंदेकर टोळी अजूनही सक्रिय आहे आणि ते पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असेल.
Sikandar Shaikh : मैदान मारणारं पोरगं गजाआड, लेकासाठी बापाचं काळीज तुटलं; डोळ्यात पाणी आणून सरकारला आर्त विनवणी
खात्री करण्यासाठी पुन्हा कोयत्याने वार
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या. त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गणेशचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणात सहभागी होता. त्यानेच त्यावेळी हत्येसाठी लागणारी पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली होती. त्यावेळी समीरसह आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे या चौघांनी मिळून 9 पिस्तुले धुळेमार्गे मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती तपासात समोर आली होती.

