शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची आज बैठक पार पडली. जवळपास दोन ते तीन तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर याबाबत महत्त्वाची माहिती दिली.
“आम्ही आमच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत घोषणा दिली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती तयार करुन कर्जमाफी कशी करायची, दिर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे. पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो याचा विचार व्हावा अशाप्रकारची अपेक्षा होती. त्या दृष्टीने जे मित्राचे चेअरमेन आहेत प्रवीण परदेशी, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“ही समिती कर्जमाफीबाबत ती कशापद्धतीने करता येईल, त्याचे निकष काय असतील, भविष्यात शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं ठेवता येईल या सगळ्याबाबत ही समिती सूचवणार आहे. त्याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करावी आणि त्याचे निकष काय ठरवायचे याबाबत अहवाल सादर करायचा. त्यानुसार त्या पुढच्या तीन महिन्यात म्हणजेच 30 जून 2026 पूर्वी आम्हाला कर्जमाफी करायची आहे. त्यासाठी आम्ही सर्व टप्पे ठरवले आहेत”, असं फडणवीस म्हणाले.
‘आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणे महत्त्वाचे’
“आमची सगळ्या नेत्यांशी अतिशय सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत त्यांनीदेखील मान्यता दिली आहे. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की, आम्हीदेखील कर्जमाफीच्या बाजूनेच आहोत. पण आता लगेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देणं आवश्यक आहे. कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे. आता आपण शेतकऱ्यांच्या खात्यात पैस दिले नाहीत तर शेतकऱ्यांच्या रब्बीचे पेरणी करु शकत नाहीत. म्हणून शेतकऱ्यांना खात्यात पैसे देण्याची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा झाले आहेत. साडेआठ हजार रुपये आज मंजूर झाले आहेत. दोन दिवसांत अजून पैसे जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जाणं महत्त्वाचं आहे. पुढच्या पंधरा दिवसांत 90 टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. तसेच इतरांचे तांत्रिक अडचण दूर करुन पैसे दिले जातील”, अशी महत्त्वाची प्रतिक्रिया फडणीसांनी दिली.

