मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर होते. या दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या भेटीसाठी आले. पण त्यांची भेट न घेताच फडणवीस मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.
त्यानंतर रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर संशयाची सुई गेली. मात्र निंबाळकर यांनी सर्व आरोप फेटाळले. असं असलं तरी निंबाळकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात येत आहेत. यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तर मृत डॉक्टरची आत्महत्या नसून ही हत्या आहे आणि यामागे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी आले होते. मात्र फडणवीस हे निंबाळकर यांना भेट न देताच निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर होते. ते पुणे ग्रँड चॅलैंज टूर सायकल स्पर्धेचे किट, लोगो अनावरण आणि अधिकृत घोषणा करण्यासाठी पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. याच हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होता. देवेंद्र फडणवीस यांचा या हॉटेलमध्ये कार्यक्रम असताना त्या ठिकाणी अचानक रणजीतसिंह नाईक निंबाळकर आले. अर्थातच निंबाळकर हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम संपल्यानंतर तातडीने पुणे विमानतळ गाठत मुंबईच्या दिशेने ते रवाना झाले. यादरम्यान निंबाळकर यांना भेट न देताच फडणवीस निघून गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
निंबाळकर यांच्यावर आरोप होत असताना फलटण येथे देवेंद्र फडणवीस यांचा एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमामध्ये निंबाळकर यांना एकप्रकारे क्लीनचीट दिल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून समोर आलं होतं. त्यानंतर निंबाळकर यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र निंबाळकर यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना भेटणं टाळलं का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, दुसरीकडे रजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुण्यात भेट घेतली आहे. ते फलटणमध्ये दोन दिवसात एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर देणार आहेत. येत्या शनिवारी फलटणमध्ये ही पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या निंबाळकर यांच्यापासून देवेंद्र फडणवीस दोन हात लांब राहत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आणि सुषमा अंधारे यांनी निंबाळकर यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरू केल्यानंतर आता निंबाळकर या सगळ्यांना काय उत्तर देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

