बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आता मनोज जरांगे पाटील यांचीदेखील एन्ट्री होणार आहे. त्यामुळे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
बच्चू कडूंनी पुकारलेल्या आंदोलनाने चार महामार्गांची वाहतूक ठप्प केली. त्यामुळे राज्य सरकारचं टेन्शन वाढलं होतं. विशेष म्हणजे कोर्टात या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल झाली. कोर्टाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करण्याचे आदेश दिले. बच्चू कडू यानंतर नागपूर पोलिसांकडे स्वत:हून अटक होण्यासाठी पायी निघाले होते. त्यांच्यासह हजारो आंदोलक पोलीस ठाण्याच्या दिशेला निघाले होते. या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली.
नागपुरात मोठ्या घडामोडी
राज्य सरकारचं शिष्टमंडळ रात्री आठ वाजता बच्चू कडू यांच्या भेटीसाठी नागपुरात दाखल झालं. राज्य सरकारकडून मंत्री पंकज भोयर, मंत्री आशिय जयस्वाल या दोन मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने नागपुरात खापरी येथे भेट घेतली. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळातील मंत्र्यांचं आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळाचं जवळपास तासभर चर्चा झाली. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर ही चर्चा झाली. या दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ वरिष्ठांसोबत बोलण्यासाठी बाजूला गेलं होतं.यानंतर बच्चू कडू यांची मनधरणी करण्यात शिष्टमंडळाला यश आलं. बच्चू कडू यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची विनंती केली. त्यानुसार बच्चू कडू यांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. असं असलं तरी आंदोलन रात्रभर सुरुच राहणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी मांडली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलो असता आंदोलकांना प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडून घेतली.
मनोज जरांगे काय म्हणाले?
दुसरीकडे मनोज जरांगे आज रात्री उशिरा आंदोलनस्थळी दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. “शेतकरी सगळे नागपुरला बसले आहेत. ज्यावेळेस अटीतटीची वेळ असते त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मायबापांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. नागपूरची परिस्थिती कशी झाली, तिथले गोरगरीब, दिव्यांग बांधव बसले आहेत. तिथे शेतकरी वर्ग बसला आहे. तिथे खूप अटीतटीची वेळ आहे. त्यामुळे या वेळेला खमक्यापणे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही तातडीने लगेच नागपूरकडे निघालो आहोत. शेतकऱ्यांचं म्हणणं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. त्यांना साथ दिली पाहिजे या दृष्टीकोनाने आम्ही तातडीने नागपूरकडे निघालो आहोत”, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

