Satara Doctor Girl Case: साताऱ्यातील फलटणमध्ये डॉक्टर तरुणीनं तळहातावर सुसाईड नोट लिहीत जीवन संपवलं. सदर तरुणीने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर याला फोटो पाठवत धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, “घटना घडली त्यादिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता. तेव्हा डॉक्टर तरुणी ही प्रशांत बनकरच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी, लक्ष्मीपूजनासाठी होती. यावेळी फोटो काढण्यावरून, फोटो नीट आले नाहीत यावरून डॉक्टर तरुणीचा प्रशांतसोबत वाद झाला. या वादाचं रुपांतर नंतर मोठ्या भांडणामध्ये झालं. या भांडणानंतर डॉक्टर तरुणी ही एका मंदिराजवळ गेली. तेव्हा प्रशांत बनकरच्या वडिलांनी समजूत घातली आणि तुम्ही इतक्या उशिरा मंदिराजवळ थांबू नका, असं सांगून त्यांना घरी आणलं. पण डॉक्टर तरुणी तिथून लॉजवर गेली. तेव्हाही डॉक्टरचे आणि प्रशांत कम्युनिकेशन सुरू होते. रात्रभर तिने प्रशांत बनकरला मेसेज केले. प्रशांत बनकरचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झाला आहे,” अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे.
“लॉजवर गेल्यानंतर मी आत्महत्या करेन, असं म्हणत तरुणीने प्रशांत बनकरला फोटोही पाठवले आहेत. मात्र तू याआधीही मला अनेकदा अशी धमकी दिली आहे, असं प्रशांत बनकर तिला म्हणाला,” असं दोघांच्या संभाषणावरून स्पष्ट झाल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

