Solapur Accident: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात झाला असून चंदन काटा परिसरात एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात शहनाज महेबूब शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती महेबूब शेख गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडला. शहनाझ शेख व महेबूब शेख हे दाम्पत्य सोलापूर हैदराबाद रोडवर असलेल्या तांदुळवाडी(दक्षिण सोलापूर) येथील नातेवाईकाचे लग्न उरकून दुचाकीवरून कुंभारी येथील घरी जात होते. इतर नातेवाईक हे त्यांच्या पाठीमागे रिक्षाने येत होते. हैदराबाद रोड येथे पाठीमागून येणाऱ्या एसटीने त्यांना अक्षरशः फरफटत नेले. यात शहनाज या गाडीखाली आल्यामुळे त्यांचा चेंदामेंदा झाला होता. पती महेबूब यांना जखमी अवस्थेत सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर
शहनाझ शेख या महिलेचा मृतदेह रस्त्यावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडला होता. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. महेबूब शेख हे देखील गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या बाजूला पडले होते. रविवारी त्री उशिरा त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना घडल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांना माहिती कळताच, तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मयत शहनाज यांच्या पश्चात आई, पती, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.

