रयत सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंगराव पाटील यांच्या निधनाने सातारा जिल्ह्यातील एक पुरोगामी नेता हरपला आहे.
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकरांचा वारसा
उंडाळकर कुटुंबाला स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांचा वारसा आहे. २४ ऑगस्ट १९४२ रोजी दादा उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली कराड मामलेदार कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा ‘चले जाव’ चळवळीचा भाग होता. कराड मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवण्यात आल्यानंतर दादा उंडाळकर यांना ब्रिटीशांनी अटक केली होती. त्या दादा उंडाळकरांचे जयसिंगराव पाटील हे सुपूत्र होते.
कराड दक्षिणमधील वाडी-वस्तीशी संपर्क
कराड दक्षिणचे आमदार झाल्यानंतर विलासकाका उंडाळकर हे सातारा जिल्हा आणि राज्यस्तरावर नेतृत्व करू लागले. त्यावेळी जयसिंगराव पाटील यांनी कराड दक्षिणमधील वाडी-वस्तीवरील लोकांशी संपर्क ठेवून कामे केली. विलासकाका आणि जयसिंग बापू या बंधुंनी सामान्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करण्याची संधी दिली. रयत सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून दीर्घकाळ जयसिंगराव पाटील यांनी कारखान्याचं अध्यक्षपद सांभाळलं. त्याचबरोबर ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाची सोय केली. स्वा. सै. शामराव पाटील नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले.
दहा दिवसांपूर्वी झाला होता वाढदिवस
जयसिंगराव पाटील यांचा १० ऑक्टोबर रोजी वाढदिवस झाला होता. नुकतेच त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षात पदार्पण केलं होतं. असंख्य जुन्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु, त्यांची प्रकृती ठिक नव्हती. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे कराड तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत होते. अखेर मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
मान्यवरांनी घेतलं अंत्यदर्शन
सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील, किसनराव जाधव, शेती मित्र अशोकराव थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जयसिंगराव पाटील यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, पुतणे, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.

