छगन भुजबळ यांनी विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंसोबतचा व्हिडीओ दाखवत निशाणा साधला. आपण नागपूरला वडेट्टीवार यांनी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्याला का गेलो नव्हतो? त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं.
“विजय वडेट्टीवर एकच मुद्दा घेऊन उभे राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण जरांगेंच्या जवळ जावून एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून, अंबडच्या मीटिंगमध्ये जावून तुम्ही सांगणार की, तुमच्याबरोबर आहे. नंतर आमच्याकडे पाठ फिरवणार. हे कसंकाय शक्य आहे? म्हणून मी संपादकांना सांगितलं की, बघा हे व्हिडीओ”, असं छगन भुजबळ म्हणाले.
“तुम्ही तासा-तासाला बदलायला लागलात तर ओबीसी समाजाचा घात होईल. मी इथे पक्षासाठी काम करत नाहीत. आम्ही इथे ओबीसींसाठी काम करतो. आम्ही पक्षाच्या दावणीला बांधलो गेलो नाहीत. पक्षाच्या वेळीला पक्षाचं काम करु. पण ओबीसींच्या वेळेला फक्त ओबीसींसाठीच लढणार”, असा निर्धार भुजबळांनी बोलून दाखवला.
“तुम्ही राजकारण करु नका. तुम्हीच म्हणाला होता की, मराठा समाजाला आरक्षण द्या आणि देवेंद्र फडणवीस यांना काढा म्हणत आहात. हे तुमचं राजकारण आहे. ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं त्या विखे पाटील यांचं नाव घ्याना. ते नाही. त्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे. मला माहिती आहे. तुमच्या सर्व मतदारसंघात ओबीसी आणि मागासवर्ग आहेत. तुम्ही वारंवार बदलत असाल तर हे चालणार नाही”, असं भुजबळांनी ठणकावून सांगितलं.
छगन भुजबळ आणखी काय-काय म्हणाले?
“मराठा समाजाला आमचा विरोध नाही. मराठा समाज आणि आमच्यात अंतर हे अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं. मराठा समाजाला आम्ही वारंवार वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला. मुंबईत 10-15 हजार माणसं आणली, सरकारने थोडी नरमाईने घेतली म्हणून तुमची दादागिरी झाली. पोलिसांना सांगितलं असतं ह्यांना कामाला लावा. एक रात्र थांबायला पाहिजे होतं. पोलिसांनी मुंबईचा सर्व रस्ता साफ केला होता. हे लोकं मराठा समाजाचे नव्हते. तर ते दारुवाले, वाळूचोर होते. या दरिंदे पाटलाने आणलेले त्याचे लोक होते.”
“आम्ही आतापर्यंत गप्प बसलो. पण किती गप्प बसायचं? मी 374 जातींसाठी बोललो. आम्ही सांगतो तुमचं आरक्षण वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका. आम्हाला वेडं समजलं का? आम्हाला मुर्ख समजू नका. एक आवाड बंजारा समाजाने दिल्यानंतर आदिवासी समाज उठला. पण आम्ही मात्र गप्प बसायचं आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसवून घ्यायचं हा कुठला न्याय आहे? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, ओबीसी तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, अरे महाराष्ट्र काय तुमच्या सात-बाऱ्यावर लिहून दिला का? हे मागे बसलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लढले.”

