Akola News : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक दुर्दैवी अपघात झाला. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते परत येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाची काहीच चूक नव्हती मग काय घडलं जाणून घ्या.
अपघातग्रस्त वाहनात शिवसेना शिंदे गटाचे अकोला शहरप्रमुख अनिकेत ढवळे, शिवराम गिरी, निखिल हिवराळे, राजू गावत्रे, अंकुश खंडारे आणि अक्षय कैलास म्हसाळ (वय २७) हे सहा कार्यकर्ते प्रवास करत होते. पंचगव्हाण फाट्याजवळ रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर जनावर आडवे आले. वाहनचालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीने जवळपास ५ ते ६ पलट्या घेतल्या.
मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत व्हाट्सॲपला स्टेटस, नंतर ओबीसी कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल, अकोला हादरलं
अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. वाहनातील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अकोल्यातील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अक्षय कैलास म्हसाळ या युवकाचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने संपूर्ण तेल्हारा तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघातानंतर तेल्हारा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून या अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर अचानक आलेले जनावर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अकोला दंगलीची SIT चौकशी; तपासात हलगर्जीपणा केल्यावरुन सर्वोच्च न्यायलयाचे पोलिसांवर ताशेरे
अक्षय म्हसाळ याच्या निधनामुळे शिवसेना शिंदे गटातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या सहकाऱ्यांसह मित्रपरिवाराने त्याच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. अकोला व तेल्हारा परिसरात हा विषय चर्चेचा बनला असून स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या वेळी रस्त्यांवर जनावरांची वाढती संख्या याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

