Shivsena Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्ष मतदारयाद्यांमधील गोंधळावर एकत्र आले असून बैठकीनंतर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर उद्धव ठाकरेंनी टीका केली. तसंच 1 जुलैची मतदारयादी ग्राह्य धरल्यास अनेकांना मतदानाचा हक्क मिळणार नाही, असा आक्षेप उद्धव यांनी नोंदवला.
उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषेदत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे. “मला निवडणूक आयोगाचा अपमान करायचा नाही, पण या दोघांकडे निवडणूक आयुक्त म्हणून अधिकार आहेत की आम्ही कठपुतळ्या बाहुल्यांशी बोलतोय, असं बैठकीत आम्हाला वाटत होतं,” असं ते म्हणाले. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 1 जुलैची मतदारयादी ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणजे 1 जुलैनंतर ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाली असतील त्यांना या निवडणुकीत मतदानाचा अधिकारच मिळणार नाही, असा आक्षेपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी नोंदवला आहे.
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:
– सुप्रीम कोर्टाने जशा पक्षी-प्राण्यांच्या केस सुमोटो म्हणून घेतल्या तशा निवडणूक प्रक्रियेबाबत सुमोटो केस घ्यावी. लोकशाही टिकवण्यासाठी हे गरजेचं आहे.
– आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य पार पाडतोय, निवडणूक आयोगाचं दार ठोठावतोय. पण समोरून काही दाद मिळत नाही.
– लोकशाहीच्या नावाने हुकूशाही लादणार असतील तर आम्ही ते होऊ देणार नाही.
– जोपर्यंत निवडणूक मतदार यादीतील घोळ सुधारला जात नाही, तोपर्यंत निवडणुका घेता कामा नये.
– विधानसभा निवडणुकीत जे झालं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. त्यामुळे आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चोरवाटा आता अडवल्या आहेत. मतचोरी आणि पक्षचोरी या सत्ताधाऱ्यांच्या चोरवाटा आहेत आणि या वाटा आम्ही आता अडवल्या आहेत.

