Pune Gangster News : पुण्यात संघटित गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. आंदेकर, घायवळ आणि आता टिपू पठाण टोळी सक्रिय झाली असून खंडणी आणि मालमत्ता बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारी टोळ्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही, ज्यामुळे पुणेकरांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे.
काळेपडळ परिसरात एका व्यावसायिकाच्या मालकीच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामागे नाव निघालं रिझवान उर्फ टिपू पठाणचं जो आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पठाण आणि त्याच्या साथीदारांनी संबंधित मालकाला धमकी दिली की, “जागा सोडायची नसेल, तर २५ लाख रुपये दे, नाहीतर परिणाम भोगावे लागतील.” या धमकीनंतर 31 वर्षीय पीडित व्यक्तीने काळेपडळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टिपू पठाणसह १३ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास काळेपडळ पोलिस करत आहेत.
टिपू पठाण हा आधीपासूनच गुन्हेगारी विश्वात कुख्यात नाव आहे. मारहाण, खंडणी, धमकी आणि बेकायदेशीर मालमत्ता व्यवहार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. विशेष म्हणजे, अलीकडच्या आयुष कोमकर हत्याकांडातही पठाण टोळीचं नाव समोर आलं होतं. आंदेकर टोळीला शस्त्र पुरवठा केल्याचा संशय त्याच्यावर आहे.
दरम्यान, पुणे पोलिसांकडून सध्या विविध गुन्हेगारी टोळ्यांवर सर्जिकल स्ट्राइक सुरू आहे. परंतु, पोलिसांच्या कारवायांनंतरही या टोळ्यांना कायद्याचा धाक उरलेला नाही, हे समोर येत आहे. आंदेकर, घायवळ आणि आता पठाण टोळी या तिन्ही गटांमुळे शहरातील गुन्हेगारीचे चित्र अधिकच गडद झाले आहे. दररोज एक नवीन टोळी, नवा गुन्हा, आणि नवीन बदला, पुणे पोलिसांची कारवाई वेगाने सुरू असली तरी, शहराला पुन्हा सुरक्षित करण्यासाठी किती कठोर पावलं उचलावी लागतील? हा प्रश्न आता पुणेकरांच्या मनात आहे.

