Sanjay raut writes letter to CM Devendra Fadnavis: सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ १४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार संजय राऊत पत्र लिहून एक विनंती केली आहे.
सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याची विनंती करताना संजय राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोगाला भेटणे ही आता एक औपचारिकता असली, तरी लोकशाही व्यवस्थेतील या सर्वोच्च संस्थेशी संवाद ठेवणे अत्यावश्यक आहे.” या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राज ठाकरे यांच्यासह विविध प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्याची विनंती या पत्रातून संजय राऊतांनी केली आहे.
BMC Election : मनसेशी युती ठरली, मुंबईत जागावाटपाच्या बोलणीसाठी उद्धव ठाकरेंचे तीन शिलेदार, घोषणेचा मुहूर्तही निश्चित?
“हे राजकारण नाही, तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आहे,” असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता बैठकीनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सर्व नेते एकत्रितपणे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊतांचं संपूर्ण पत्र
प्रिय श्री. देवेंद्र फडणवीसजी
जय महाराष्ट्र!
मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा लवकरच घोषीत होतील. जिल्हा परिषदा, नगरपालिका व राज्यांतील महानगर पालिकांचा यात समावेश आहे. अत्यंत महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांच्या यंत्रणेवर आणि प्रकियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष पध्दतीने संविधानाचे पूर्ण पालन करून व्हाव्यात ही राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांची भूमिका आहे. सध्याच्या निवडणूक प्रकियेबाबत काही शंका नक्कीच आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी एक सर्वपक्षिय शिष्टमंडळ दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार आहेत. शिष्टमंडळात सहभागी होण्याबाबत श्री. शरद पवार, श्री. उध्दव ठाकरे, श्री. राज ठाकरे, श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांना कळविले आहे व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. माझी आपणास विनंती आहे की या शिष्टमंडळात आपण स्वतः सहभागी होऊन सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा वाढवावी. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून लोकशाही बळकट व्हावी व निवडणूक यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ व्हावी हीच भावना आहे.
कळावे,
आपला नम्र,
(संजय राऊत)
निवडणूक आयोगावर होणारे आरोप चर्चेत
देशामध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये व्होट चोरी झाली, असे आरोप राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेले आहेत. त्यांनी विविध पत्रकार परिषदा घेत भारतातल्या निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने विविध स्पष्टीकरणंही दिली आहेत.

