• Fri. Mar 13th, 2026

    Pune Accident : मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले; कार दुभाजकाला धडकल्याने चेंदामेंदा

    Pune Accident : मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले; कार दुभाजकाला धडकल्याने चेंदामेंदा

    पुण्यात अपघाताची घटना समोर आली आहे. मद्यधुंद कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण घडलं आहे. मद्यधुंद कारचालकाने एका दुचाकीला धडक देत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत दुचाकी चालक थोडक्यात बचावला आहे. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळ शनिवारी सायंकाळी एका मद्यधुंद वॅगनर चालकाने भरधाव गाडी चालवत दुचाकीस्वाराला धडक देत फरफटत नेले. या अपघातात अन्य दोघांनाही धडक बसली. कार दुभाजकाला आदळल्याने तिचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी संबंधित चालकाविरुद्ध ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिकेत रमाकांत सोनटक्के याला ताब्यात घेतलं आहे. तो 25 वर्षांचा आहे. तो सध्या चाकणचा रहिवासी असून मूळचा धाराशिवचा आहे.

    रंगमंदिर परिसरात खत्री वडेवाले यांच्या समोरून एक वॅगनर कार वेगात आली आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला, मात्र कारचालकाने दुचाकीला फरफटत नेत ओंकारेश्वर मंदिरापर्यंत गाडी चालवत नेली. सुदैवाने दुचाकीस्वार वेळेत बाजूला पडल्याने गंभीर अपघात टळला.

    यानंतर आरोपी चालकाने शनिवार पेठेकडे गाडी वळवली आणि पुणे मनपाच्या समोरील पुलावर एका पथारीवाल्या महिलेलाही धडक दिली. अखेरीस गाडी पुलावरील खांबाला जाऊन धडकली. त्यावेळी चालक आणि गाडीतली अन्य चार युवक मद्यधुंद अवस्थेत आढळले.

    घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त गाडी उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. गाडीची पुढील बाजू आणि डावी बाजू पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.

    डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी सांगितले की, “या अपघातात दुचाकीस्वार ओंकार देशमुख किरकोळ जखमी झाला. त्याने तक्रार देण्यास नकार दिला असला तरी कारचालकाविरुद्ध ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

    पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांनी सांगितले की, “अनिकेत सोनटक्केवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर परिसरात त्याने आणखी कोणाला धडक दिली का, याचीही चौकशी सुरू आहे.”

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा