Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहेत. सिंधुदुर्गातील झाराप तिठा येथे दुचाकी व कारचा भीषण अपघात घडला. यामध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. या भीषण घटनेनंतर संतप्त नागरिकांनी महामार्गावरच काही काळ ठिय्या मांडला.
झाराप येथील शाळेत सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर हे विद्यार्थी दुचाकीवरून जात असताना मुंबईच्या दिशेने जाणार्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. त्यानंतर घटनास्थळी तहसीलदार व पोलीस तात्काळ दाखल झाले व मार्ग मोकळा करण्यात आला. या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही कुडाळ पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात पंधरा वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेकदा अपघात घडत असतात. या अपघातात आजवर अनेकांचे जीव गेले आहेत. असाच हा मोठा दुर्दैवी अपघात आज पुन्हा एकदा झाला आहे. या अपघातात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन विद्यार्थी गंभीर त्या जखमी झाले आहेत.
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातही यापूर्वी महामार्गावर अनेकदा अपघात झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेक कुटुंबही याच अपघातात उध्वस्त झाल्याचे दुर्दैवी प्रकार घडले आहेत.

