Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांना आरक्षणातील काहीच कळत नाही. भुजबळ यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळेच ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आलं आहे, असा दावा राठोड यांनी केला.
हरिभाऊ राठोड पुढे म्हणाले की, “ओबीसीच्या यादीत 425 जातींचा समावेश आहे. त्यापैकी फक्त कुणबी ही एक जात म्हणत आहे की शासनाने काढलेला जीआर बरोबर आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणापत्र दिले जात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र वापरून ओबीसी म्हणून फॉर्म भरतील, आम्ही काहीही करू शकणार नाही. आरक्षणामुळे बंजारा समाजाचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरपंच आणि सदस्य होणार नाही. छगन भुजबळ यांना आरक्षणाचं काहीच कळत नाही. त्यांना फॉर्म्युला देखील माहिती नाही. त्यांच्या चुकीमुळे ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं आहे. तेव्हा त्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन न घाबरता जेलमध्ये जायला पाहिजे आणि शहीद झाले पाहिजे,” असं वक्तव्य राठोड यांनी केलं.
मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. “मराठा आरक्षण जीआरमुळे फडणवीस यांना वाटतं नसलं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का बसला आहे. फडणवीस यांनी आरक्षण प्रश्नाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी केली आहे. जीआरमधून त्यांनी ओबीसी समाजाला अंगावर घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची खुर्ची जाण्याची वेळ आली आहे,” असा दावा हरिभाऊ राठोड यांनी केला. बंजारा समाज आता जागरूक झाला आहे. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी आगामी दिवसात मुंबईलाही मोर्चा काढणार असल्याचे राठोड म्हणाले.
दरम्यान, बंजारा समाजाच्या विरोधात आदिवासी समाजाकडून मोर्चे काढले जात आहेत. यावरून राठोड यांनी आदिवासी नेत्यावर नाराजी व्यक्त केली. आदिवासी समाजाला आरक्षण मिळून ७० ते ७५ वर्ष झालेत. गोंड, प्रधान, कोलाम, आंध, पारधी या मेजर जातीतील एकही जण आयपीएस आयएएस का झाले नाहीत, कोण खात आहे आरक्षण? असा सवाल राठोड यांनी उपस्थित केला.

