Nashik News: नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय कुरघोडीला वेग आला असून दोन भाजपच्या माजी नगरसेवकांना खुनाच्या प्रयत्नात अटक झाली. यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपला घेरलं असून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पोलिस आयुक्तांसोबत बैठक घेतली.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नाशिक शहरात काही दिवसांपासून खूनसत्र सुरू असून, कोयता गँगसह ‘एमडी’ ची खुले आम विक्री होत असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे खुनाच्या प्रकरणांमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे व जगदीश पाटील यांनाच अटक करण्यात आली आहे. यावरून सत्ताधारी भाजपच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे ठाकले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याने नागरिकाकंडून पोलिसांवर टीका होत आहे. अशातच भाजपकडे अंगुलनिर्देश होत असतानाच शिवसेना शिंदे गटाने गुन्हेगारीवरून मित्र पक्षालाच घेरण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
नाशिकरांसाठी Good News! जयपूर-हैदराबादसाठी विमानसेवा, जाणून घ्या नवे वेळापत्रक
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करत असताना दुसरीकडे मंत्री दादा भुसे यांनी कायदा सुव्यवस्थेबाबत बैठक घेऊन आपला पक्ष नामोनिराळा असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. जिल्ह्यातील पूरस्थितीत शेतकरी पूर्णत: अडचणीत सापडला असताना भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत गुन्हेगारीवरून एकमेकांवर सुरू झालेली कुरघोडी आता चर्चेचा विषय ठरत आहे. महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असून, त्याची पूर्वतयारी सुरू झाल्यामुळे आगामी काळात सत्ताधारी महायुतीतील दोन पक्षांमधील संघर्ष उफाळून येणार असल्याचे चित्र आहे.

