शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीला कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला तिरुपती तिरुमला देवस्थानाकडून १.६६ लाख रुपये किमतीचा मानाचा शालू अर्पण करण्यात आला. १९७०-८० च्या दशकापासून चालत आलेली ही परंपरा दोन्ही देवस्थानांमधील भक्ती आणि आध्यात्मिक बंधाचे प्रतीक आहे.
तिरुपती तिरुमला देवस्थानाचे पदाधिकाऱ्यांनी दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमाला महत्त्व दिले आहे. सोमवारी परंपरेप्रमाणे तिरुपती येथील व्ही प्रभाकर रेड्डी, आमदार व्ही प्रशांती रेड्डी आणि भानूप्रकाश रेड्डी यांसह तिरुपती तिरुमला देवस्थानकडून देवीसाठी शालू आणण्यात आला होते. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे हा शालू सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर तिचे विधिवत पूजन अंबाबाई मंदिरात करण्यात आले. या धार्मिक विधीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
काय आहे नेमकी परंपरा?
तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्याची ही परंपरा 1970-80 च्या दशकापासून चालत आली आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या दिवशी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात हा शालू अर्पण केला जातो. त्यानंतर अंबाबाई देवीला हाच शालू दसऱ्या दिवशी नेसवला जातो. पुढे नवरात्रोत्सव संपल्यानंतर लिलाव पद्धतीने हा शालू भाविकांना विकला जातो. येणारी रक्कम देवस्थान विकास कामे वापरली जाते. खरंतर तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून देशातील प्रमुख शक्तिपीठांना मानाचा सन्मान म्हणून शालू पाठवण्याची धार्मिक परंपरा आहे. त्यातच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या अंबाबाई देवीला सुद्धा या परंपरेत सामील करुन घेण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे.
या परंपरेबाबत बोलताना प्रसन्न मालेकर यांनी सांगितले की, तिरुपती देवस्थानाकडून अंबाबाई देवीसाठी येणारा हा मानाचा शालू म्हणजे भक्तीची भावना आणि आध्यात्मिक बंधाचे प्रतीक ठरतो. या सुमारे ५० वर्षांच्या धार्मिक साखळीतून दोन्ही देवस्थानांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक नात्याला मजबूत आधार मिळतो. त्यामुळे या शालू अर्पण परंपरेला भाविकांसोबतच दोन्ही देवस्थानांच्या स्थानिकांकडून उत्सुकता आणि श्रद्धापूर्वक पाहिले जाते.
श्री महाकाली रूपात अंबाबाई देवीची सालंकृत पूजा
शारदीय नवरात्रोत्सवातील आठव्या दिवशी सोमवारी श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे सकाळी 4 ते रात्री 8 पर्यंत 1 लाख 78 हजार 206 इतक्या भाविकांनी दर्शन घेतले. देवीची सोमवारी दशमहाविद्या श्री महाकाली रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. श्री महाकाली मातेची उत्पत्ती अष्टमीला मानली जाते. भगवती काली हे आदिशक्तीचं तमोगुणमय रूप विश्वाच्या निर्मितीपूर्वीचं आहे. दशमहाविद्यांमध्ये कालीच्या नावाने स्वतंत्र कुल आहे. केवळ विनाशाची देवता म्हणजे काली नव्हे, तर काली ही अथांग अशा परब्रम्हाच्या अव्यक्त रुपाची मूर्तीमंत आकृती आहे अशी माहिती हक्कदार श्रीपूजक अविनाश मुनीश्वर यांनी दिली. अविनाश यांच्यासह विनायक चौधरी, उमेश सांगावकर यांनी बांधली. तर नारायण माजगावकर आणि विजय माजगावकर यांचे पूजा बांधण्यासाठी विशेष सहकार्य लाभले.

