Women harassed in Mumbai Locals: मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या चार दिवसांत विनयभंगाच्या सात घटना घडल्या. धावत्या लोकलमध्ये आणि रेल्वे स्थानकांवर हे प्रकार घडले. यामुळे महिला प्रवाशांमध्ये संताप आहे. लोहमार्ग पोलिसांनी काही आरोपींना अटक केली.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांची संख्या जवळपास २० टक्क्यांहून अधिक आहे. महिलांसाठी स्वच्छतागृहे, आसने अशा सुविधांची वानवा असताना महिलांविरोधातील गुन्हेही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
एका बॅगने घेतले पाच जीव? मुंब्रा लोकल अपघात प्रकारणात चौकशी समितीचा नवा खुलासा
मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पनवेल, वाशी, बोरिवली स्थानकात महिला विनयभंगाच्या तक्रारी महिलांनी नोंदवल्या आहेत. २३ ते २७सप्टेंबरदरम्यान तीन विनयभंगाच्या घटना रेल्वे स्थानकात आणि चार घटना धावत्या लोकलमध्ये घडल्या. त्यामुळे रेल्वे स्थानक असो वा धावती लोकल दोन्ही ठिकाणी महिला सुरक्षेचे उपाय तोकडे असल्याचे दिसून येत आहे.
बोरिवली रेल्वे पोलिस ठाण्यातील विनयभंगाचे दोन गुन्हे वगळता अन्य गुन्ह्यांत आरोपीला तातडीने अटक करण्यात आली आहे. बोरिवली प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. तर, वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे स्पष्ट केले.
चार दिवसांत सात तक्रारी
२३ ते २७ सप्टेंबरदरम्यान घडलेल्या घटनांमध्ये कोपरखैरणे व नालासोपारा स्थानक परिसरात, विरार धावत्या लोकलच्या सामान्य डब्यातून, पनवेल-ठाणे लोकलच्या तिसऱ्या डब्यातून, बोरिवली व पनवेल स्थानक परिसरात, तसेच दहिसर ते मिरा रोडदरम्यान मिरारोड स्थानकाजवळ महिलांवर हल्ले झाले.
पूरग्रस्तांच्या मदतीचा मुद्दा, ज्योती वाघमारे उद्धव ठाकरे अन् संजय राऊतांवर संतापल्या
हेल्पलाइनचा कॉल वेळखाऊ
महिला सुरक्षेसाठी असलेल्या हेल्पलाइनमध्ये आयव्हीआरएस प्रणाली आहे. यामुळे संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीशी थेट संपर्क साधण्याआधी एक दाबा, दोन दाबा अशा सूचना कानी येतात. ही प्रक्रिया वेळखाऊ ठरते. वेळेत मदत मिळत नाही. यामुळे आयव्हीआरएस प्रणाली बंद करून थेट हेल्पलाइन असणे गरजेचे आहे. धावत्या लोकलमध्ये, स्थानकांवर महिलांचा विनयभंग करणाऱ्या आरोपींनाही तातडीने गजांआड केले पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी केली.
