Navratri Festival News: छत्रपती संभाजीनगरमध्ये नवरात्रोत्सवात दांडिया खेळताना 35 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लासुर स्टेशन येथील स्वामी समर्थ केंद्रात ही घटना घडली असून नंदिनी पवार असे मृत महिलेचे नाव आहे. दांडिया खेळताना अचानक चक्कर येऊन त्या कोसळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी अंबादास पवार (वय 35, राहणार पाडळसा, तालुका गंगापूर, हल्ली मुक्काम बस स्टँड परिसर लासुर स्टेशन) असं मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, नंदिनी पवार या लातूर स्टेशन येथे कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. नंदिनी या जवळच असलेल्या आरापूर येथील धनंजय ऑटो कंपनीमध्ये नोकरी करत होत्या. नंदिनी यांना नवरात्र उत्सव आवडत होता. या नऊ दिवसांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत होत्या. त्यांना दांडिया खेळायला देखील आवडत होते.
मराठवाड्यात हाहाकार! मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, 141 मंडळांत अतिवृष्टी, जनजीवन ठप्प
दरम्यान, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नंदिनी या गरबा दांडिया खेळण्यासाठी स्वामी समर्थ नवरात्र उत्सवात गेल्या. उत्साहाने दांड्या खेळत असताना नंदिनी यांना अचानक चक्कर आली. यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या. नागरिकांनी तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. नंदिनी यांच्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यांच्या मूळ पाडळसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांनी रुग्णालयातच टाहो फोडला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

