• Thu. Mar 19th, 2026

    मत्स्य शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे  – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 24, 2025
    मत्स्य शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे  – महासंवाद




    मुंबई, दि. २४ : अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या १० दिवसात सादर करावा. तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळ पहाणी करून आणि मत्स्यव्यवसाय संस्थांशी संपर्क करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी, असे आदेश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज दिले.

    अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याविषयी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व मत्स्यव्यवसाय उपायुक्त दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

    मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ही वेळ असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी स्वतः मत्स्य शेतकऱ्यांना संपर्क केल्यास त्यांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतः नुकसानग्रस्त मत्स्य शेतकऱ्यांची भेट घ्यावी. पंचनामे करताना वस्तुनिष्ठ महिती घ्यावी. ज्या जिल्ह्यात पंचनामे करण्यासाठी अधिकारी कमी आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी न झालेल्या इतर जिल्ह्यातील अधिकारी नियुक्त करून पंचनामे लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी. पंचनाम्याची माहिती जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करून त्याची प्रत मंत्रालय स्तरावर सादर करावी. मत्स्य बिजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची सविस्तर माहिती सादर करावी. माहिती सादर करत असताना बाब निहाय अकडेवारी द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

    मंत्री श्री. राणे म्हणाले की, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने मत्स्य शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांमध्ये तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करावे. या कामासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी. अधिकाऱ्यांनी रोज किमान आठ ते दहा तलावांना भेट द्यावी. दिलेल्या भेटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर करावा, असेही मंत्री श्री. राणे यांनी यावेळी सांगितले.

    0000

    हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

     







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed