Mumbai Crime News : मुंबईच्या कांदिवलीत एका 69 वर्षीय वृद्धाची हत्या झाली. पोलिसांनी मृताचा मुलगा आणि त्याच्या बिझनेस पार्टनरला अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. आरोपींनी गोवंडीतील दोन लोकांना सुपारी दिल्याचे वृत्त आहे. त्यांनी वृद्धाच्या कार्यालयात घुसून धारदार शस्त्रांनी वार केले. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत वृ्द्धाचा मुलगा आणि त्यांच्या बिझनेश पार्टनरने कथितरित्या गोवंडीतील दोन रहिवाशांना 6.5 लाखांचा एक कंत्राट दिले होते. आणि 1 लाखांची आगाऊ रक्कम देखील दिली होती. यामधूनच वाद झाला असून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
आरोपींमध्ये मुलगा हमीद अय्युब सय्यद (वय 40) आणि सुपारीचा व्यापारी शानु चौधरी (वय 40) या दोघांसह मोहम्मद खैरुल कादीर अली वय 27 यांचा समावेश आहे.पोलिसांनी सांगितले की, शानू आणि हमीदने वृद्ध मोहम्मद यांना महिनभरापूर्वी व्यवसायातून हटवण्याचे ठरवले होते. त्यानंतर शानूने या प्लॅनला तडीस नेण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. शानूची खैरुलशी आधीपासून चांगली ओळख होती. त्याने खैरुरला मोहम्मद यांच्या हत्येची सुपारी दिली. आपला मित्र आपल्या काही कामी येईल या आशेने खैरुल हत्या करण्यास तयार झाला. यासाठी 6.5 लाखांची सुपारी देण्यात आली. ज्यामधील 1 लाखाची आगाऊ रक्कम देण्यात आली होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी असेही नमूद केले की, मोहम्मद सय्यद हे त्यांच्या कुटुंबासह मालाडमध्ये राहत होते, त्याचा धातूंचा व्यवसाय होता आणि वसई आणि चारकोपमध्ये त्याचे बरेच कारखाने होते. रविवारी सकाळी ते त्यांच्या कांदिवली पश्चिमेतील कार्यालयात बसले असताना 11.30 सुमारास दोन मारेकरी कार्यालयात घुसले आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तिथेच बसले. त्यानंतर संधी गाठत त्यांनी सय्यद यांच्या पोटात, पाठीत आणि हातावर धारदार शस्त्रांनी अनेक वार केले. ‘त्यांनी एका बॅगेत शस्त्रे नेली होती,’ अशी पोलिसांची माहिती आहे.

