मनसेतून बडतर्फ झालेले वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश आज दुसऱ्यांदा रखडला आहे. त्यांचा आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. पण आज तसं होऊ शकलेलं नाही.
ज्या पक्षासाठी 20 वर्ष जीवाचे रान करून एकनिष्ठ राहिलो. त्याच पक्षाने एक प्रकारे बडतर्फीच्या कारवाईने निष्ठेचे फळच दिल्याची भावना खेडेकर यांनी बडतर्फी आदेश निघताच बोलून दाखवली. गणेशोत्सव दरम्यान कोकणातील मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार 4 सप्टेंबर रोजी नरीमन पॉईंट, मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर केले होते.
शेकडो समर्थकांसह वैभव खेडेकर हे पक्षप्रवेशाची तयारी करत असतांना मात्र मराठा आंदोलनामुळे हा पक्षप्रवेश पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली. भाजप नेते, खासदार तथा माजी मंत्री नारायण राणे यांची पण तब्येत त्याच दरम्यान बिघडलेली होती. हे पण एक कारण सांगण्यात आलेलं होतं.
तदनंतर मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त कधी निघतो? याची उत्सुकता सर्व समर्थकांना लागलेली होती. त्यानुसार आज दुपारी 3 वाजता पक्षप्रवेशाचे फ्लेक्स लागलेले पाहायला मिळाले. त्यानुसार समर्थकांसह वैभव खेडेकर हे मुंबईत दाखल झाले सुद्धा.. भाजप कार्यालयाकडून पक्षप्रवेशाचे प्रेस नोट सुद्धा आज निघालेल्या नव्हत्या. दरम्यान वैभव खेडेकर हे रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या बंगल्यावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त कर्मचारी पाहायला मिळाले. कुठलाही बडा नेता त्या ठिकाणी नव्हता. स्वतः रवींद्र चव्हाण या ठिकाणी नव्हतेच.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतः नितेश राणे हे दिल्लीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे कामानिमित्त निघून गेले. त्यानंतर मात्र वैभव खेडेकर यांची आणि समर्थकांची अस्वस्थता पाहायला मिळाली. प्रवेशाची जय्यत तयारी करून मुंबईत येऊन सुद्धा जर पक्षप्रवेश होत नसेल तर माशी नेमकी शिंकली कुठे? हा प्रश्न पडतोच.
वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशामागे पडद्यामागे मोठ्या हालचाली घडतायत, असं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. मुंबईतीलच एका बड्या प्रादेशिक राजकीय पक्षाचा नेता वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश होऊ नये याकरिता काम करीत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. बातमी लिहेपर्यंत कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा भाजप पक्षप्रवेश रखडलेला आहे. दुसऱ्यांदा पक्षप्रवेश हुकलेल्या वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश नक्की कधी होतो? हे आता आगामी काळच ठरवेल.

