• Sat. Mar 7th, 2026
    Manoj Jarange Patil: मनोज जरांगे मुंबईतून जो GR घेऊन गेले, त्याविरोधातील याचिकांवर आज सुनावणीस हायकोर्टाकडून नकार, कारण…

    Maratha Reservation GR: मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला ओबीसी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला असून, या निर्णयाविरोधात न्यायालयी लढाई लढण्याची भूमिका घेतली आहे.

    मराठा आरक्षण GR विरोधातील याचिकांवर आज हायकोर्टात सुनावणी होणार नाही(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण प्रश्नावर मार्ग काढत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा शासन निर्णय 2 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील समता परिषदेसह ओबीसीतील विविध घटकांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी घेण्यात येण्याची शक्यता होती. मात्र न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने तांत्रिक कारणावरून या याचिकांवर सुनावणी करण्यास आज नकार दिला आहे. त्यामुळे आता या याचिका मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला जाण्याची शक्यता आहे.

    कुणबी प्रमाणपत्रांच्या माध्यमातून मराठ्यांचे ओबीसीकरण होणार असल्याने ओबीसी प्रवर्गात आधीपासून असलेल्या जातींवर अन्याय होणार असल्याची भूमिका ओबीसी नेत्यांकडून मांडली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या जीआरविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. या याचिकांवर आज सुनावणी अपेक्षित असताना तांत्रिक कारणांमुळे आज ही सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे याबाबतची सुनावणी कधी होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    Maharashtra Times‘जो ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणार नाही त्याला धडा शिकवा’, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

    मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींचा एल्गार, कोणकोणते नेते मैदानात?

    ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करून गोंदिया जिल्ह्यातील सकल ओबीसी समाजबांधवांनी रविवारी महाआक्रोश मोर्चा काढला. कुडवा नाका ते जयस्तंभ चौकादरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. घोषणांनी वातावरण तापले होते. सकल ओबीसी समाजाने आंदोलनाची हाक दिल्यानंतर रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ओबीसी समाजबांधव गोंदियाच्या कुडवा नाका परिसरात एकत्र आले. काँग्रेसचे विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार नामदेव किरसान, आमदार परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजकुमार बडोले, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार दिलीप बनसोड, माजी आमदार गोपालदास अग्रवाल या नेत्यांनीही हजेरी लावली.

    राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्याचा शासन निर्णय घेतला आहे. हा समाजावर अन्यायकारक असल्याचा आरोप करीत सकल ओबीसी संघटनांनी येत्या दहा ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम ते संविधान चौकादरम्यान महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मराठा समाजाला ओबीसींत सामावून घेण्याच्या निर्णयाला सुरुवातीपासून आमचा विरोध आहे. २०१६-१७मध्ये मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यापासून विरोधात होतो. तेव्हा कुणीही समजून घेतले नाही. मराठा समाजाला आमच्यातील एक टक्काही देणार नाही,’ अशी ठाम भूमिका भाजपचे आमदार परिणय फुके यांनी मांडली.

    दरम्यान, पक्ष बाजूला ठेवून लढाईत सहभागी होणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो दोन सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी पुढाकार घेईल, सोबत येईल तोच आपला आहे. काही लोक या शासन निर्णयाचे समर्थन करून समाजाची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका काँग्रेसचे विधानसभेतील नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कोणत्याही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी’ हा आमचा हक्क आहे, असे ते म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा