Solapur Politics : सोलापुरात काँग्रेस नेत्याने भाजप नेते नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. याच टीकेवरुन काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल जत तालुक्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या वडिलांवर टीका केली. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे. “नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी हिंदू धर्मावर आणि ब्राम्हण धर्मावर टीका करत होते. भाजप पक्षात गेल्यापासून त्यांनी एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा ठेका उचलला आहे. नितेश राणे पक्ष बदलले की धर्म बदलतात”, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यात भाषण करताना आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका केली. जयंत पाटील यांचे वडील राजाराम पाटील यांच्यासह जयंत पाटील यांच्या आईवरही टीका केली आहे. यावरुन काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी थेट भाजप पक्षावर टीका केली आहे. त्यांनी दिवंगत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्नेहसंबंधाचं उदाहरण दिलं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते, पण त्यांनी कधी कमरेखालची भाषा वापरली नाही, असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
काकासाहेब कुलकर्णी यांचा मार्मिक प्रश्न
“आम्ही जी भाजपा पाहिली ती अटल बिहारी वाजपेयी यांची, गोपीनाथ मुंडे यांची, सुषमा स्वराज यांची होती. पण आज भाजपातील काही वाचाळवीर हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं स्वरूपच बदलवून टाकत आहेत. प्रश्न असा आहे की, जेव्हा आपण तरुणाईला राजकारणात येण्याचं आवाहन करतो, तेव्हा अशा भाषणांचा स्तर बघून तरुण काय शिकणार? हा महाराष्ट्र आहे की बिहार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे”, अशी भूमिका काकासाहेब कुलकर्णी यांनी मांडली. दरम्यान, आता काँग्रेसच्या या टीकेवर नितेश राणे यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा