Dhule News : आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी हे गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले.
नेमकं काय झालं?
दीपक रामलाल सूर्यवंशी (रा. साक्री) याच्याविरोधात पत्नीने महिला अत्याचार प्रकरणी कौटुंबिक न्यायालयात प्रकरण दाखल केले. यावर बुधवारी सायंकाळी न्यायालयात कामकाज होणार असल्याने दीपक दिवसभर न्यायालयात हजर होते. मुलीला आपल्याजवळ राहू द्यावे, अशी त्यांची मागणी होती. निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे त्यांचे लक्ष असताना त्यांच्या विरोधात निकाल लागल्याचे त्यांना कळले. यामुळे आपल्यापासून आपले मुलगी हिरावली जाईल या भीतीने दीपक सूर्यवंशी गुरुवारी पहाटे तीन वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन बेपत्ता झाले.
व्हिडिओ व्हायरल केला
दरम्यान, दीपक यांनी बोधगाव धरणाजवळ आपल्या मोबाइलवर मुली सोबतचा व्हिडीओ तयार करून तो व्हायरल केला. त्यावरून सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता.
बंधाऱ्याजवळ बूट आढळले
ज्या बंधाऱ्याजवळ साक्री पोलिसांसह सूर्यवंशी कुटुंबीयांनी धाव घेतल्यावर बंधाऱ्याजवळ बुट दिसून आल्याने दीपक सूर्यवंशी यांनी मुलीसोबत धरणात आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. गुरुवारी सायंकाळी दोघांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
कौटुंबिक कलह वाढला
दरम्यान, राज्य महिला आयोगातर्फे आयोजित जनसुनावणी दरम्यान एकूण ६८ तक्रारी नोंदवण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामध्ये कौटुंबिक स्वरुपाच्या तक्रारींचे प्रमाण सर्वात जास्त होते. लग्नानंतर वाद झाल्यास होणाऱ्या समुपदेशनासोबतच लग्नाच्या आधी, तरुण वर्गाचे विवाहपूर्व समुपदेशन करण्यावर भर देणं आवश्यक आहे. येत्या काळात राज्य महिला आयोग विवाहपूर्व समुपदेशन केंद्राबाबत पुढाकाराने काम करणार असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.

