सोलापुरात एक विचित्र घटना समोर आली. शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षकांना निमंत्रण देण्यात आलं. या कार्यक्रमात गावातील मुस्लिम समाजाचे शिक्षक शौकत बाशु शेख हे देखील उपस्थित होते. इतरांप्रमाणे त्यांचाही कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पण या कार्यक्रमावरुन एका व्यक्तीने गरड ओकण्याचं काम केलं. त्याच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
शहाजान फतरु कोरबू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मानेगावामध्ये 300 ते 400 मुस्लिम समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. मानेगाव येथील परमेश्वर नागनाथ राऊत हा नेहमी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना पाहुन हे लोक मटन खातात. तसेच त्यांना बोलत जाऊ नका असे म्हणून शिवीगाळ करत होता. मानेगाव येथील शिक्षक सुशील आंनद पारडे यांनी 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गावातील विठ्ठल मंदीरामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाकरिता गावातील सर्व शिक्षक तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिक कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाला शौकत बाशु शेख या शिक्षकाला देखील बोलावले होते. त्यामुळे ते कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम रात्री 10 वाजण्याच्या सुमारास संपला. आयोजक आणि शौकत शेख हे बाहेर आले तेव्हा तेथे गावातील परमेश्वर नागनाथ राऊत हा आला. त्याने कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांना “मुस्लिम शिक्षक आणि मुस्लिम समाजाचे लोक गोमांस खाऊन विठ्ठल मंदीरात आले. त्यामुळे देवस्थानाची विटंबना झाली. मुस्लिम शिक्षकांना आणि मुस्लिम लोकांना का बोलावले?”, असं म्हणत गोंधळ घातला. त्यानंतर त्याने इन्स्टग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट करत घाबरायचे नाही, असे विधान केले. त्याने जातीवादी आणि तेढ निर्माण करत अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखवणारे भडकाऊ पोस्ट मोबाईलवरुन प्रसारित केल्या आहेत.
अल्पसंख्याक आयोगाची तात्काळ दखल
ही सर्व घटना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुऱ्हाण यांच्याकडे लेखी स्वरूपात करण्यात आली होती. वसीम बुऱ्हाण यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे लेखी तक्रार केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार माढा पोलीस ठाण्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी परमेश्वर राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच राज्य अल्पसंख्याक आयोगाचे वसीम बुऱ्हाण यांनी महत्त्वाचं आवाहन केलं. अल्पसंख्याक समाजात येत असलेल्या शीख, ख्रिचन, मुस्लिम, जैन, बौद्ध यांना आवाहन केले आहे. कोणत्याही बाबतीत अन्याय होत असेल तर अल्पसंख्याक आयोग तात्काळ मदतीस येणार असे आश्वासन दिले आहे.

