Beed News: आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यास सुरुवात झाल्यानंतर विजयसिंह पंडित यांनी हाकेंना डिवचलं आहे.
“गोरगरीब गरजवंत मराठा तरुणांना आता हे सांगणे आहे की, समाज बांधवांनी केलेल्या मागण्या शासनाने मान्य करून या बाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे आता या बाकीच्या दंड थोपटण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. ज्याला कोणाला माकड उड्या मारायच्या त्या निवांत मारू दया, दुर्लक्ष करा. या माकड उड्या आरक्षण बचावासाठी नसून राजकारणासाठी आहेत. संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा संघर्ष आणि त्यांना समाजाने दिलेल्या पाठबळ यांमुळे हे आरक्षण मिळाले आहे, जे शक्य नव्हते ते शक्य झाले आहे. भविष्यात काय होईल या पेक्षा आज जे हातात आले आहे त्याचा फायदा घ्या,” असं आवाहन विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.
बापरे! चाळीसगावात बड्या नेत्याच्या कार्यालयातून 2 कोटींची रोकड चोरीला गेली? उन्मेश पाटील यांचा खळबळजनक दावा
तरुणांना आवाहन करताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, “पुढील काळात चांगले दर्जेदार शिक्षण घेणे आणि चांगल्या पद्धतीने नोकरी, व्यवसाय करून स्वतःच्या कुटुंबाला मोठं करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. देश आणि जग फिरा, नवीन तंत्रज्ञान, विज्ञान आणि स्किल आत्मसात करा, विज्ञानवादी बना. चार चांगले दिवस आले म्हणून राजकारण हे तुमचे ध्येय अजिबात ठेवू नका, तुम्ही मोठे झाल्यानंतर ईतरांना हातभार लावा, तरच या सगळ्या संघर्षाचे फलित होईल,” असं मतही आमदार पंडित यांनी व्यक्त केलं.
दरम्यान, “एक चांगला माणूस आणि समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा, सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी प्रयत्न करा, शासना कडून प्रशासकीय पातळीवर काम सुरू झाले आहे, तुम्ही सुद्धा पुढे येऊन त्याचा लाभ घ्यावा, हीच या माध्यमातून विनंती आहे,” अशा भावना विजयसिंह पंडितांनी व्यक्त केल्या आहेत.

