• Mon. Jun 8th, 2026

    पुणे गँगवॉर : लेकाने दिलेलं भेटकार्ड दाखवलं, छातीला कवटाळलं, टाहो फोडला, गणेश कोमकरच्या हातात नेमकं काय?

    पुणे गँगवॉर : लेकाने दिलेलं भेटकार्ड दाखवलं, छातीला कवटाळलं, टाहो फोडला, गणेश कोमकरच्या हातात नेमकं काय?

    Aysuh Komkar : आयुष कोमकरच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्याच्या अंत्य संस्कारावेळी पॅरोलवर सुटलेला पिता गणेश कोमकर आला होता. गणेशने पोलीस व्हॅनमधून उतरताच आपल्या हातातील भेटकार्ड सर्वांना दाखवलं. ते पाहून अनेकांना गणेशच्या हातात नेमकं काय आहे? असा प्रश्न पडला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : बाप आणि मुलाचं नातं हे कधीही शब्दांत सांगता येणारं नसतं. एका पित्यावर आपल्या मुलाला अग्निडाग देण्याचं दुर्दैवं कधीच ओढवू नये. पुण्यात टोळी युद्धामुळे एका निष्पाप लेकराला आपला जीव गमवावा लागला. तो अवघ्या 20 वर्षांचा होता. तो शिक्षण करत होता. त्याचा या टोळी युद्धाशी काहीच संबंध नव्हता. पण कुटुंबात सुरु झालेल्या टोळी युद्धाने त्याचा बळी घेतला. पुण्यात तीन दिवसांपूर्वी ऐन गणेशोत्सवात नाना पेठेत 20 वर्षीय तरुणाची हत्या झाली. या तरुणाचं नाव आयुष कोमकर असं आहे. तो नुकताच क्लासमधून घराच्या दाराशी आला होता. या वेळी दबा धरुन बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

    आयुषच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर हा पॅरोलवर सुटून आला होता. तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आहे. याच हत्या प्रकरणी तो नागपूरच्या कारागृहात गेल्या वर्षभरापासून शिक्षा भोगत आहे. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याच्या टोळीने त्याच्या सख्या नातवाचा बळी घेतला. हे टोळी युद्ध कुटुंबातल्या कुटुंबात इतक्या टोकावर पोहोचलं आहे.

    दरम्यान, आयुषच्या अंत्यविधीवेळी पुणे पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केलेला होता. कोणताही घातपात घडू नये यासाठी काळजी घेण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणजे आधी आयुषचं पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं. यानंतर पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर अंत्यविधीसाठी आला. यावेळी त्याने पोलीस व्हॅनमधून उतरताच लोकांना काही फोटो दाखवले. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. गणेश नेमकं काय दाखवू पाहत आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. माध्यमांनी गणेशच्या हातात नेमकं काय आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गणेशने यावेळी स्वत: रडत आपल्या हातात नेमकं काय आहे ते सांगितलं.

    गणेशच्या हातात त्याच्या मुलाने आयुषने दिलेलं भेटकार्ड होतं. या भेटकार्डमध्ये ‘आय लव्ह यु पप्पा’ असं लिहिलेलं आहे. गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना आयुषने आपल्या पित्याला हे खास भेटकार्ड पाठवलेलं होतं. या भेटकार्डमध्ये गणेश कोमकर आणि मुलगा आयुषचे लहानपणापासून फोटो आहेत. आयुषने आपल्या पित्याला ते फोटो जेलमध्ये गिफ्ट दिले होते. तसेच त्यामध्ये ‘नवीन ड्रेस पाठवला आहे’, असंही आयुषने लिहिलेलं होतं. आयुषने स्वत:च्या हातांनी त्या भेटकार्डमध्ये ‘आय लव्ह यु पप्पा’ लिहिलेलं होतं.

    आयुषने आपल्या पित्याला दिलेली हे शेवटची भेटवस्तू होती. हीच भेटवस्तू घेऊन गणेश आपल्या मुलाच्या अंत्यविधीला आला होता. गणेशने आधी हे भेटकार्ड लोकांना दाखवलं. यानंतर तो मुलाच्या पार्थिवाकडे गेला. त्याने मुलाच्या पार्थिवाजवळ टाहो फडला. तो ढसाढसा रडू लागला. तो मुलाला त्याच्या भेटकार्डबद्दल सांगू लागला. ते भेटकार्ड आपण जपून ठेवल्याचं सांगू लागला. त्याने ते भेटकार्ड अगदी छातीशी कवटाळून घेतलं. तो यावेळी प्रचंड रडत होता. त्याचा आक्रोश तिथे उपस्थित असणाऱ्यांच्या काळजाला चीर पाडत होता. यावेळी प्रचंड शोकाकुल वातावरण झालेलं होतं.

    गणेशने यावेळी पोलिसांना सवाल केला. माझी काही चूक नव्हती. तरी आपल्या लेकराचा जीव का घेतला गेला? असा सवाल त्याने पोलिसांना केला. तसेच मला स्वत:ला गोळ्या घाला, असं म्हणत गणेश कोमकर रडत होता. यावेळी आयुषचे इतर भावंड आणि नातेवाईकही आक्रोश करत होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा