Washim Accident : ट्युशन क्लासेसला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीला खाजगी ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम-पुसद मार्गावरील काकडदाती फाट्यावर आज सकाळी घडली. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे.
अपघात होतांनाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्स चालकाने वाहन थांबवून अपघातग्रस्त संध्याची पाहणी केली. मात्र जोरदार धडक बसल्याने ती रस्त्याच्या कडेला पडून होती. स्थानिक नागरिकांनी तिला दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संध्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून खाजगी ट्रॅव्हल्स आणि चालकाला ताब्यात घेतले आह. या प्रकरणी पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत.
काकडदाती फाटा बनला मृत्यूचा सापळा
काकडदाती फाट्यावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात. या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा फाटा अपघाताचा सापळा बनला असल्याची चर्चा जोर धरत आहे. काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी अमोल सारसकर नामक युवक रस्ता ओलांडताना एका वाहनाने त्याला धडक दिली असता त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या महामार्गावर गतिरोधक बसविण्यात आले होते. त्यानंतर इथे अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता मार्गावरील गतिरोधक फुटले असल्याने पुन्हा इथून भरधाव वाहने धावू लागल्याने रस्ता ओलांडताना आज पुन्हा एका निष्पाप विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे फुटलेले गतिरोधक दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, अशाप्रकारचा अपघात घडू नये यासाठी प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. प्रशासनाकडून वेळोवेळी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जातं. रहदारीच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावाजवळून जात असताना भरधाव वेगाने गाडी चालू नये, असं आवाहन केलं जातं. पण तरीही काही वाहनचालकांकडून भरधाव वाहन चालवली जातात. परिणामी अपघाताच्या घटना घडतात आणि अनेकांना जीव जातो. तसेच अनेकदा काही जण रस्ता ओलांडताना वाहन लांब आहे की जवळ याची दक्षता घेतली जात नाही. त्यामुळेदेखील अपघाताची घटना घडते.

