• Mon. Mar 9th, 2026
    जिथे तोडफोड केली, दहशत माजवली; तिथेच पोलिसांकडून गुंडांचा करेक्ट कार्यक्रम, काय घडलं?

    Nagpur News : नागपूरच्या शांतीनगरमध्ये पैशांच्या किरकोळ वादातून गुंडांनी धुडगूस घातला. ज्यात २० हून अधिक वाहनांची तोडफोड झाल्याने मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १७ आरोपींना अटक केली आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : पैशांच्या किरकोळ वादातून शांतीनगर परिसरात बुधवारी रात्री शस्त्रांनी सुसज्ज गुंडांनी केलेल्या तांडवामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले होते. एनआयटी गार्डनजवळ या टोळक्याने २० पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड केली. परंतु पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांतच १७ आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांची धिंड काढून नागरिकांसमोर उभे केले. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास वाढला असून गुंडगिरीविरोधात ठोस संदेश गेला आहे.

    ही घटना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. शैलेश नावाच्या एका तरुणाचा पैशांच्या वादावरून काही युवकांशी वाद सुरू होता. वाद वाढताच आरोपींनी शैलेशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून मारहाण थांबवली. त्यावेळी आरोपींनी “पाहून घेऊ” अशी धमकी देत घटनास्थळ सोडले. काही वेळातच सुमारे १५ ते २० जण पुन्हा तलवारी, लाठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शैलेशचा शोध घेतला, पण तो न मिळाल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक व तोडफोड सुरू केली. काही मिनिटांतच २० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले. आरडाओरड व दहशत निर्माण करणाऱ्या या कृतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

    यावेळी परिसरात गणेशोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसाद वितरण सुरू होते. अचानक झालेल्या गोंधळामुळे नागरिक घाबरून गेले. महिलांमध्ये व ज्येष्ठांमध्ये भीती निर्माण झाली आणि काहींनी सुरक्षिततेसाठी घरांचा आश्रय घेतला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राहुल मदने, शांतिनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि क्राइम ब्रांचचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अल्पावधीतच १७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळावर आणून त्यांची परिसरात धिंड काढली. या मुळे पीडितांना आरोपींची ओळख पटवणे सोपे झाले आणि लोकांनी थेट त्यांच्याविरुद्ध तक्रारी नोंदवल्या.

    नागपूर शहरात गुंडगिरी सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांनी या कारवाईदरम्यान दिला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी घटनेला गंभीर मानून आरोपींवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आणि योग्य माहिती देण्याचे आवाहन केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा