• Fri. Jul 31st, 2026

    Nagpur News: दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांसाठी जागा; पार्किंग पदपथसह वाहतूक कोंडीवर उपाययोजना

    Nagpur News: दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांसाठी जागा; पार्किंग पदपथसह वाहतूक कोंडीवर उपाययोजना

    Nagpur News: शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते तसेच पदपथांवर अतिक्रमण देखील केल जातं या सगळ्या समस्यांवर महातपालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात केली. त्यासाठी शिस्तबध्द व्यवस्थापन आणि त्यासाठी पायलट उपक्रम राबवण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी,नागपूर: शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अनियोजित ऑन-स्ट्रीट पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमण या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. याअंतर्गत धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमधील दहा प्रमुख रस्त्यांवर पथविक्रेत्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी प्रायोगिक तत्त्वावर पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ‘मटा’ने शहरातील वेगवेगळ्या भागांतील पदपथांवरील अतिक्रमणासंदर्भात वृत्त प्रकाशित करीत प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

    उच्चस्तरीय आढावा बैठक झाली

    ऑन-स्ट्रीट पार्किंग आणि पथविक्रेता व्यवस्थापनासाठी धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मनपा मुख्यालयात उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीत निवडक रस्त्यांवरील वाहतूक, पार्किंग, पदपथांचा वापर आणि पथविक्रेत्यांची मांडणी यांचा एकत्रित विचार करून नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

    निर्देश देण्यात आले.

    बैठकीत आयटीडीपी इंडियाने शहरातील ऑन-स्ट्रीट पार्किंगची रणनीती, झोननिहाय रस्त्यांची निवड आणि वाहतुकीवरील संभाव्य परिणाम याबाबत सादरीकरण केले. त्यानंतर आयुक्तांनी निवडक रस्त्यांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यासाठी तातडीने सल्लागार किंवा सर्वेक्षक नियुक्त करण्याचे निर्देश मनपाच्या प्रकल्प विभागाला दिले. पार्किंग व्यवस्थापनासाठी मनपा, वाहतूक पोलिस, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामेट्रो यांच्यात समन्वय साधण्यासाठी विशेष कार्यशाळा घेण्याचेही निर्देश देण्यात आले.

    Maharashtra TimesVidarbha Rain: विदर्भाला पावसाचा तडाखा! गडचिरोली जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्ग बंद, भामरागडमध्ये सातशे जण सुरक्षितस्थळी

    व्यवस्थापनाचे आराखडे सादर केले.

    यावेळी पीडीए पुणेच्या पथकाने धरमपेठ झोन, फुटाळा परिसर आणि मेडिकल कॉलेज चौकातील पथविक्रेता व्यवस्थापनाचे आराखडे सादर केले. त्यानुसार धरमपेठ आणि लक्ष्मीनगर परिसरातील दहा प्रमुख रस्त्यांवर नियोजित विक्रेता क्षेत्र निश्चित करणे, पदपथ मोकळे ठेवणे आणि पादचाऱ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे, या बाबींवर भर दिला जाणार आहे.

    व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल,प्रशासनाचा विश्वास

    दरम्यान, आयआरटीई संस्थेने शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, वाहतूक सुलभीकरण आणि रस्ते सुरक्षेसाठी तयार केलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. शहरातील पार्किंग, पथविक्रेता व्यवस्थापन आणि वाहतूक सुधारणा यांचा समन्वित आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास, पदपथ नागरिकांसाठी मोकळे होण्यास आणि शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

    Maharashtra TimesMangesh Jagtap : ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट

    प्रतिनिधी उपस्थित होते.

    बैठकीला नागपूर शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांच्यासह आयटीडीपी इंडिया, पीडीए पुणे आणि आयआरटीई या तज्ज्ञ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा