बीड दि.३१ : गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. तसेच, नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये,यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
००००
