Chhatrapati Sambhajinagar News : डेंटल फिल्म आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात गुंतवणुकीवर महिन्याला १३ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ठकसेनने मोठी फसवणूक केली. लाखो रुपये घेऊन तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याला नाशिकमध्ये वेशांतर करून टॅक्सी चालवताना अटक केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल गणेश चौधरी वय ३२ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एडवोकेट गुडेपेल्ली ज्ञानेश नागेश राहणार अलिलाबाद असे तक्रारदाराचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुडेपेल्ली नागेश यांचा मामेभाऊ राजन पेंटम व त्याचा मित्र अभिजीत नानेकर यांच्याच ओळखीतून नागेश यांची विशाल चौधरी याच्याशी ओळख झाली होती. यावेळी चौधरीने गुडेपेल्ली यांना त्याच्या डेंटल फिल्म सप्लाय व ट्रान्सपोर्ट व्यवसायात गुंतवणूक केल्यास १३ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यामुळे नागेश यांनी ८.४० लाख रुपये त्याला दिले. या व्यवहाराचा करार केला. मात्र महिनाभरातच चौधरीने प्रतिसाद देणे बंद केले. प्रतिसाद मिळत नसल्याने नागेश यांनी आंध्रप्रदेश मध्ये तक्रार केली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी विशाल चौधरी पसार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन तो हाती लागला नाही. विशाल चौधरी पुण्यात शिफ्ट झाल्याचे पोलिसांना समजले. तिकडे दाढी केस वाढवून त्याने वेशांतर केलं होतं. त्यानंतर त्याने एका टॅक्सी कंपनीत चालक म्हणून काम सुरू केलं होतं. याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

